नगराध्यक्षांच्या प्रभागातच घाणीचे साम्राज्य
By Admin | Updated: July 8, 2014 00:56 IST2014-07-07T23:17:24+5:302014-07-08T00:56:57+5:30
बीड: बीड नगर परिषदेच्या वतीने शहरात मान्सूनपूर्व मोहीम राबविण्यात आली. गल्लोगल्लीत जाऊन नाल्या सफाई, रस्ते स्वच्छ करण्यात आले.

नगराध्यक्षांच्या प्रभागातच घाणीचे साम्राज्य
बीड: बीड नगर परिषदेच्या वतीने शहरात मान्सूनपूर्व मोहीम राबविण्यात आली. गल्लोगल्लीत जाऊन नाल्या सफाई, रस्ते स्वच्छ करण्यात आले. ही मोहीम मागील महिनाभरापासून शहरात ठिकठिकाणी राबविली जात आहे. ही मोहीम राबविणाऱ्या नगराध्यक्षा यांच्याच प्रभागात घाणीचे साम्राज्य आढळून आले. या भागातील रहिवाशांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी समस्यांचा पाढाच वाचून दाखविला.
‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ ही मोहीम नगराध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर यांनी राबविली. या मोहिमेला त्यांनी चांगल्या प्रकारे सुरुवातही केली. त्यांनी शहरातील विविध भागात जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. नगर परिषदेच्या विविध विभागातील कर्मचारी सोबत घेऊन त्यांनी समस्या जागेवरच मार्गी लावल्या. मात्र त्यांच्याच प्रभागात समस्यांचा ढिगारा पहावयास मिळाला. या भागातील नाल्याही तुंबलेल्या होत्या. रस्ते व्यवस्थित नव्हते तर वीजपुरवठा करण्यासाठी खांबावरील ताराही लोंबकळलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
या भागातील काही महिलांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास टाळले, मात्र काही महिलांनी समोर येऊन समस्यांचा पाढाच वाचून दाखविला. एकीकडे डॉ. क्षीरसागर यांनी ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ ही मोहीम मोठ्या उत्साहाने सुरू केली. मात्र कर्मचाऱ्यांकडून या मोहिमेला सहकार्य मिळत नसल्याने सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
नगराध्यक्षांना समस्यांपर्यंत जाऊच दिले जात नाही
‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ या मोहिमेंतर्गत दीपा क्षीरसागर या गल्लोगल्ली जाऊन महिलांच्या, तेथील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतात. त्या समस्यांचा ‘आॅन दी स्पॉट’ फैसला करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. मात्र ज्या भागात नागरिकांच्या खऱ्या समस्या आहेत त्या भागात नगराध्यक्षांना न.प.चे कर्मचारी जाऊच देत नाहीत, असा आरोपही येथील काही नागरिकांनी केला.
नाल्या तुंबलेल्या तर रस्त्यावर खड्डे
या भागातील मुख्य रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा दिसून आला. या भागातील नाल्याही तुंबलेल्या होत्या. मान्सूनपूर्व कामांमध्ये नाल्यांची सफाई करणे आवश्यक असतानाही ती न झाल्याने संताप व्यक्त केला जात होता. तसेच या भागातील रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले होते. वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना चालताना कसरत करावी लागत होती. रस्त्यांचीही डागडुजी करण्यात आलेली नाही.
सफाई केल्याच्या स्वाक्षऱ्या आहेत
याबाबत न.प.चे स्वच्छता निरीक्षक जोगदंड यांना विचारणा केली असता ते म्हणाले, आठ ते दहा दिवसांपूर्वीच या भागातील नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. येथील नागरिक नाल्यांमध्ये कचरा टाकत असल्याने नाल्या तुंबत आहेत. नाल्या सफाई केल्या म्हणून येथील नागरिकांच्या स्वाक्षऱ्याही आमच्याकडे आहेत. आम्ही पाहणी करुन पुन्हा स्वच्छता करु. (प्रतिनिधी)
नगराध्यक्षांनी स्वत: लक्ष देण्याची मागणी
शहरातील प्रभाग क्र.२, ३ व ४ मधील केली पाहणी
रंगार गल्ली, विप्रनगर, शनि मंदिर गल्लीतील नागरिकांमधून ऐकावयास मिळाल्या तक्रारी
स्वत: नगराध्यक्षांनी लक्ष देऊन समस्या ऐकून घेण्याची होतेय मागणी
नगराध्यक्षांना समस्यांपर्यंत जाऊ दिले जात नसल्याचा आरोप