बजाजनगरात पसरले घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:42 IST2019-07-15T23:41:51+5:302019-07-15T23:42:24+5:30
बजाजनगरातील स्वच्छतेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने मुख्य रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढिग साचले आहेत.

बजाजनगरात पसरले घाणीचे साम्राज्य
वाळूज महानगर : बजाजनगरातील स्वच्छतेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने मुख्य रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. परिणामी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरील कचºयाचे ढिग पहाता एमआयडीसीत उभारलेल्या खत प्रकल्पाचा उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. कचरा कुजून परिसरात साथीचे रोग पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
वाळूज महानगरातील बजाजनगर ही मुख्य कामगार वसाहत असून, येथील साफ-सफाई व स्वच्छतेची जबाबदारी एमआयडीसीकडे आहे. एमआयडीसीने एका खाजगी ठेकेदाराला स्वच्छतेची जबाबदारी दिली आहे. संबंधित ठेकेदाराकडून साफ-सफाईकडे लक्ष दिले जात नाही. वेळेवर कचरा संकलन केले जात नाही. शिवाय साचलेला कचराही उचलला जात नाही.
त्यामुळे येथील कचरा प्रश्न गंभीर बनत आहे. नियमित वेळेवर घंटागाडी येत नसल्याने नागरिक घरातील साचलेला कचरा मुख्य रस्त्यावर आणून टाकत आहेत. शिवाय लगतचे व्यावसायिकही रात्रीच्या वेळी रस्त्यावर कचरा टाकत आहेत. येथील महाराणा प्रताप चौक, कोलगेट चौक, स्मशानभूमी परिसर, इंद्रप्रस्थ कॉलनी आदी ठिकाणी मुख्य रस्त्यावर जागोजागी कचºयाचे ढिग साचले आहेत.
रामलीला मैदाना समोरील खदान तर कचरा डेपोच बनली आहे. वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून डासाचे प्रमाणही वाढले आहे. याबरोबरच साथीचे आजार जडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.