धोकादायक वसाहती?

By Admin | Updated: August 1, 2014 01:09 IST2014-08-01T01:01:40+5:302014-08-01T01:09:05+5:30

संतोष हिरेमठ, औरंगाबाद पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर बुधवारी सकाळी आठच्या सुमारास डोंगराचा संपूर्ण कडाच कोसळला. अंदाजे ८०० लोकवस्तीचे हे संपूर्ण गाव गाडले गेले.

Dangerous Colonies? | धोकादायक वसाहती?

धोकादायक वसाहती?

संतोष हिरेमठ, औरंगाबाद
पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर बुधवारी सकाळी आठच्या सुमारास डोंगराचा संपूर्ण कडाच कोसळला. अंदाजे ८०० लोकवस्तीचे हे संपूर्ण गाव गाडले गेले. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर परिसरात डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतींचा घेतलेला हा आढावा.
औरंगाबाद शहराच्या चारही बाजूंनी डोंगर आहेत. गेल्या काही वर्षांत शहराची ओळख सर्वाधिक झपाट्याने वाढणारे शहर म्हणून होत आहे. सातारा, देवळाई, कांचनवाडी, भावसिंगपुरा, हर्सूल अशा बाजूंनी शहर वाढतच आहे. शहराचा विस्तार थेट डोंगररांगांपर्यंत झाला आहे. उंच इमारती उभ्या राहिल्या. निसर्गाच्या अगदी जवळ डोंगराच्या पायथ्याशी आणि रम्य वातावरणातील या वसाहती सर्वांचे लक्ष वेधून घेतात; पण त्या किती सुरक्षित आहेत?
डोंगरांवरील वृक्षांचे महत्त्व
डोंगररांगांमध्ये झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. झाडांची मुळे माती धरून ठेवतात. परंतु वृक्षतोडीमुळे माती मोकळी होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे डोंगररांगांत वृक्षारोपण वाढले पाहिजे. शहराजवळील डोंगररांगांत पाषाणाचे प्रमाण अधिक आहे. तसेच आपल्याकडे पावसाचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे माळीण गावासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकत नाही. परंतु ढगफुटी अथवा अधिक पाऊस पडला तर परिसरातील काही वसाहतींना धोका पोहोचण्याची शक्यता आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एम. बी. मुळे यांनी सांगितले.
डोंगर पोखरुन प्लॉटिंग
जटवाडा रोडवर हळूहळू डोंगराच्या पायथ्याशी वसाहती निर्माण होत आहे. डोंगर पोखरण्याचा प्रकार इथे सुरु आहे. सातारा आणि देवळाई परिसरातील डोंगराच्या पायथ्याशीही आता प्लॉटिंग होऊ लागली आहे. भविष्यात याठिकाणीही वसाहती निर्माण होणार आहेत.
खोदकाम अन् वृक्षतोड
डोंगराच्या पायथ्याशी ठिकठिकाणी माती, मुरूम खोदला जात आहे.
डोंगरावरील वृक्षतोडही दिसते. पर्यावरण आणि तेथील वसाहतींसाठी ही बाब धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
मोठमोठ्या दगडांचा धोका
शहराजवळील डोंगरांच्या उतारावर अनेक ठिकाणी मोठे दगड उभे दिसतात. अनेक ठिकाणी अगदी घरांच्या बाजूला मोठे दगड पडलेले दिसतात. डोंगराच्या कडेला राहणारे याबद्दल चिंता व्यक्त करतात.
डोंगरपायथ्याशी वसाहती
भावसिंगपुरा परिसरातील निसर्ग कॉलनी, कमलनगर, आदर्श कॉलनी, शाक्यनगरसह विविध भाग डोंगराच्या पायथ्याशी आहे.
शहराजवळील सातारा गाव, सातारा परिसरातील सुधाकरनगरसह डोंगराजवळ वसाहती झाल्या आहेत. ठिकठिकाणी उंच इमारतींची बांधकामे सुरू आहेत. कोठे घरांचे बांधकाम झाले तरी तेथे राहायला कोणी आलेले नाही.

Web Title: Dangerous Colonies?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.