सोशल नेटवर्कींगचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई
By Admin | Updated: November 21, 2014 00:46 IST2014-11-21T00:32:29+5:302014-11-21T00:46:40+5:30
जालना : सोशल नेटवर्कींग माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी दिला आहे.

सोशल नेटवर्कींगचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई
जालना : सोशल नेटवर्कींग माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी दिला आहे.
जालना शहरासह जिल्ह्यात सोशल नेटवर्कींग माध्यमाच्या अनेक तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह असे छायाचित्र सोशल नेटवर्कवर झळकवल्याबद्दल त्यांच्यासह काही समर्थकांनी जिल्हा पोलिस प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या. त्याची पोलीस अधीक्षक सिंह यांनी गांभीर्याने दखल घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना या प्रकरणाचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सिंह यांनी सोशल नेटवर्कींग माध्यमांचा म्हणजेच फेसबुक असो की व्हॉटसअपच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर, चित्र किंवा चित्रफित प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा तसे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असाही इशारा दिला. यासंदर्भात कुणास हे प्रकार होत असल्याचे आढळून आल्यास त्यांनी नजीकच्या पोलिस ठाण्यांना किंवा नियंत्रण कक्षास माहिती द्यावी. त्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही आवाहन केले.
सोशल नेटवर्कींग माध्यमांचा वापर करून अश्लील मजकूर प्रसारित करणे तसेच एखाद्याच्या बदनामीस कारणीभूत ठरणे, दोन गटात तणाव निर्माण होईल, असा मजकूर, फोटो किंवा संदेश प्रसारित करणे हा माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच भा.दं.वि अंतर्गत गुन्हा आहे. असे प्रकार करून समाजाचे स्वास्थ बिघडवू नये. मजकुरावरून प्रसारित होणाऱ्या अफवांवर नागरिकांनीही विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी केले. (प्रतिनिधी)
माजी आमदार गोरंट्याल यांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या एका पथकाने तात्काळ हालचाली सुरू केल्या. आक्षेपार्ह चित्र तयार करून प्रसारित करणाऱ्या इसमाची माहिती प्राप्त केली. ते आक्षेपार्ह चित्र रहेमानगंज या भागात राहणाऱ्या आजम साबेरखान याने फेसबुकवर प्रसारित केल्याचे निदर्शनास आले. या पथकाने त्यास तात्काळ ताब्यात घेतले असून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे.
४फेसबुकवर आक्षेपार्ह चित्र तयार करून प्रकाशित केल्याने अज्ञात समाजकंटकानी नूतन वसाहत भागात एका बसवर दगडफेक केली. पोलिसांनी तात्काळ बस फोडणारे दीपक वैद्य, आनंद लालझरे, भाऊराव कासारे यांना ताब्यात घेतले.
४स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक कुलकर्णी, अर्जुन पवार, डॅनियल जाधव, अमोल देशमुख, धनाजी कावळे, गजू भोसले, साई पवार, रामदास जाधव हे या कारवाईत सहभागी होते.