पॉलिटेक्निक संस्थाकडून धोक्याची घंटा
By Admin | Updated: June 30, 2014 00:38 IST2014-06-30T00:12:03+5:302014-06-30T00:38:06+5:30
श्रीनिवास भोसले, नांदेड पॉलिटेक्निकला प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कीटचा पासवर्ड कोणत्याही संस्थेला अथवा व्यक्तीला देवू नये
पॉलिटेक्निक संस्थाकडून धोक्याची घंटा
श्रीनिवास भोसले, नांदेड
पॉलिटेक्निकला प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कीटचा पासवर्ड कोणत्याही संस्थेला अथवा व्यक्तीला देवू नये, असे केल्यास आॅप्शन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांसोबत धोका होवू शकतो़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉलेज निवडताना स्वत: लक्ष देवून पसंती क्रमांक द्यावेत़
मराठवाड्यात जवळपास ६१ संस्थांमध्ये पॉलिटेक्निक कॉलेज आहेत़ यातील बऱ्याच संस्थांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याने जागा रिक्त राहतात, अशा संस्था विविध शक्कल लढवून प्रवेश वळविण्याच्या प्रयत्नात आहेत़ गत दोन दिवसांपासून पॉलिटेक्निक प्रवेश अर्ज कीटची विक्री आणि नोंदणी सुरू झाली आहे़ दोन दिवसांमध्ये शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे ११०० कीटची विक्री झाली आहे़ दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व नोंदणी करणे, आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया आदीविषयी फारशी माहिती नसते़ याचाच फायदा घेण्याच्या प्रयत्नात काही संस्था आहेत़ अनेक खाजगी संस्थांमध्ये पॉलिटेक्निकच्या विविध शाखा उपलब्ध असूनदेखील सुविधा आणि गुणवत्तेअभावी विद्यार्थी या संस्थामध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक नाहीत़ त्यामुळे अशा संस्थामध्ये अनेक जागा रिक्त राहत आहेत़ कोणत्याही परिस्थितीत आपल्या संस्थेतील प्रवेश पूर्ण करून घेण्यासाठी संस्थाचालक आणि तेथील प्राध्यापक वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत़ काही संस्थाचालकांनी नेट कॅफे चालकाशी संगणमत करून आॅप्शन फॉर्म भरताना आपल्या कॉलेजला एक क्रमांकाची पसंती देण्याचे नियोजन केले आहे़
आॅप्शन फॉर्म भरताना अशी घ्यावी काळजी़़़
पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांनी आॅप्शन फॉर्म भरताना काळजीपूर्वक कॉलेज निवडावेत़ याठिकाणी कॉलेजला पसंती देताना जे कॉलेज पाहिजे त्या कॉलेजलाच क्रमांक एकची पसंती द्यावी, यानंतर अनुक्रमे कॉलेजनुसार पसंती क्रमांकाचे पर्याय भरावेत़ आॅप्शन फॉर्मवरील माहिती स्वत: काळजीपूर्वक भरावी़
विद्यार्थ्यांची आर्थिक लूट
पॉलिटेक्निकची आॅनलाईन प्रवेशपूर्व नोंदणीपासून ते प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नेट कॅफेवर विद्यार्थ्यांकडून ४०० ते ६०० रूपये घेवून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जात आहे़ ही बाब लक्षात घेवून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ५० रूपये नाममात्र शुल्क घेवून आॅनलाईन नोंदणी करून दिली जात आहे़
प्रवेश अर्जाच्या पासवर्डबाबत गोपनियता ठेवा़़़
पॉलिटेक्निक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कीट घेतल्यानंतर आॅनलाईन नोंदणी करावी लागते़ यानंतर अर्ज व कागदपत्रांची छाननी होते़ आक्षेप नोंदविणे व दुरूस्त करणे़ तद्नंतर गुणवत्तेनुसार प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना आॅनलाईन त्यांच्या लॉगीनमधून कोणते कॉलेज हवे यासंदर्भात पर्याय द्यावे लागतात़ अशावेळी पासवर्ड दुसऱ्या व्यक्तीला अथवा संस्थेला माहिती असेल तर समोरील व्यक्ती त्यास पाहिजे त्या संस्थेचे नाव क्रमांक एकवर टाकेल़ जेणेकरून त्या संस्थेचे प्रवेश अधिक होतील़ काही संस्था विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया मोफत करून देण्याचे आमिष दाखवून त्यांचे पासवर्ड आपल्याकडे जमा करून घेत आहेत़ ज्या विद्यार्थ्यांनी पासवर्ड दिले आहेत त्यांनी पर्याय (आॅप्शन फॉर्म) भरताना स्वत: उपस्थित राहून आपल्याला पाहिजे त्या कॉलेजला अनुक्रमे पसंती क्रमांक द्यावेत़ जेणेकरून त्या विद्यार्थ्यांस पाहिजे ते कॉलेज मिळण्यास मदत होईल़
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया समिती
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्राचार्य एस़ एम़ खासीम यांच्या मार्गदर्शनाखाली आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया समिती नियुक्त करण्यात आली़ यामध्ये अध्यक्ष प्रा़डॉ़ जी़ एम़ डक , उपाध्यक्ष प्रा़डॉ़एस़व्ही़बेट्टीगिरी, ए़ आऱ शकुर, प्रा़ एस़ आऱ मुधोळकर, व्ही़ व्ही़ कुलकर्णी, एस़ पी़ राठोड, श्रीमती एस़ जी़ दुटाळ, के़ एस़ कळसकर, श्रीमती डॉ़एम़ व्ही़ यादव, श्रीमती डॉ़ ए़ ए़ जोशी, व्ही़ के़ फुलवळकर, शेख अफसर, जी़ एम़ नंदे, एस़ बी़ चव्हाण, आऱ एस़ मध्यैबैलवाड, डी़ एम़ शिरवंदे यांचा समावेश आहे़