जिल्हा बँकेकडून कोंडी

By Admin | Updated: December 22, 2014 23:56 IST2014-12-22T23:56:01+5:302014-12-22T23:56:01+5:30

कळंब : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांची करोडो रुपयांची जमापुंजी अडकली आहे.

Dandi by the District Bank | जिल्हा बँकेकडून कोंडी

जिल्हा बँकेकडून कोंडी



कळंब : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांची करोडो रुपयांची जमापुंजी अडकली आहे. बँकेत स्लिप दिली तर चलनटंचाईचे कारण पुढे करून रकमा दिल्या जात नाहीत. अशा स्थितीत सध्या बँकेत पीक विमा भरून घेतला जात आहे. यात कहर म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे आपल्या खात्यावर शिल्लक जमा आहे, त्यांना ती रक्कम विम्यासाठी वळती करून घेण्यासही नकार देत शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे.
कळंब तालुक्यात उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्तीसहकारी बँकेच्या कळंब, मार्केट यार्ड, ईटकूर, मोहा, येरमाळा, मस्सा, वाघोली, शिराढोण, दहिफळ, कळंब शहर, खामसवाडी, पाडोळी या ठिकाणी १२ शाखा आहेत. एकेकाळी ही बँक शेतकऱ्यांचा मुख्य आधार होती. ग्रामीण भागातील सर्वस्वी व्यवहार या शाखेवर अवलंबून होते. पीक कर्जापासून ते शेती विकासापर्यंत या बँकेतून कर्ज दिले जात असे. शिवाय शेतकरी, शेतमजूर आपली शिल्लक जमापुंजी या बँकेत मोठ्या विश्वासाने ठेवत होते. परंतु सध्या बँक अडचणीत आल्याने शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. हक्काची रक्कम बँकेच्या पायऱ्या झिजवूनही पदरी पडत नाही.
बँकेच्या तालुक्यातील शाखांतील रोखपालाचे टेबल गेल्या चार-पाच महिन्यापासून ठप्प आहे. बँकेत अनेकांच्या मुदत ठेवींचा कालावधी संपला आहे. त्यांनाही आपापल्या रकमा मिळत नाहीत. बचत खात्यावरील रक्कम मिळण्यासाठी शेतकरी बँकेच्या शाखेत स्लिप भरून देतात. मात्र त्यांना चकरा मारायला भाग पाडून अखेर पैसे नाहीत, असे सांगितले जाते. सध्या राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेसाठी जिल्हा बँकेतील शाखेत विमा प्रस्ताव भरून घेतले जात आहेत. यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. यावर्षी खरीप हंगामात उत्पादन आणि उत्पन्नाने साथ न दिल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आला आहे. रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना विमा भरण्याची इच्छा असताना केवळ हातात छदामही नसल्याने अडचण निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर अशा असंख्य शेतकऱ्यांची बँकेत थोडीबहुत जमापुंजी शिल्लक आहे. ही रक्कम वळती करून विम्यापोटी जमा करण्यास बँक व्यवस्थापन नकार देत आहे. एकतर रक्कम मागूनही दिली जात नााही आणि खात्यावर असतानाही ती वळती करण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे एकप्रकारे शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा हा प्रकार आहे. (वार्ताहर)
पंचक्रोशीतील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्यांची खाती असलेल्या लाभार्थ्यांना पैसे देण्यापुरतेच आता बँकेचे काम उरले आहे. जिल्हा बँकेच्या शाखा आता केवळ निराधारांच्या रकमा देण्यापुरत्याच काम करीत असून, तेवढाच काय तो निराधारांना आधार आहे. मात्र खात्यावर रक्कमा असतानाही त्यांना त्यांचे पैैसे दिले जात नाहीत. या कारभाराबद्दल कोणीतरी आवाज उठवायला हवा. शेतकऱ्यांची बाजू मांडायला हवी. तरच शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे. दुष्काळी परिस्थतीत आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा पीक विमा भरून घेताना बँकेतील त्याच्या खात्यावरील रक्कम वळती करावयास हवी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

Web Title: Dandi by the District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.