दामिनी पथकाकडून अकरा सडक सख्याहरींना चोप
By Admin | Updated: June 19, 2014 23:48 IST2014-06-19T23:48:52+5:302014-06-19T23:48:52+5:30
जालना : महिला पोलिसांच्या दामिनी पथकाने बुधवारी गर्दीच्या रस्त्यांवर थांबून महिला व मुलींची छेड काढणाऱ्या अकरा सडकसख्याहरींना चांगलाच चोप दिला

दामिनी पथकाकडून अकरा सडक सख्याहरींना चोप
जालना : महिला पोलिसांच्या दामिनी पथकाने बुधवारी गर्दीच्या रस्त्यांवर थांबून महिला व मुलींची छेड काढणाऱ्या अकरा सडकसख्याहरींना चांगलाच चोप दिला. त्यामुळे अनेक सख्याहरींनी तेथून पळ काढला.
पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी शाळा व महाविद्यालय सुरू झाल्यापासून त्या परिसरात मोठ्या प्रमाणात गस्त वाढविली आहे. त्यासाठी १० महिला पोलिस कर्मचारी दामिनी पथकात नव्याने नियुक्त करण्यात आल्या आहेत.
चार महिन्यांपासून दामिनी पथकाने शहराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात कारवाया करून आंबटशौकीन व सडक सख्याहरींना चांगलीच चपराक दिली होती. मात्र या पथकाच्या प्रमुख पोलिस उपनिरीक्षक शुभांगी सूर्यवंशी यांची पदोन्नतीवर बीड येथे बदली झाली.
त्यामुळे त्यांचा पद्भार कमल गिरी यांच्याकडे देण्यात आला आहे. या पथकाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणखी दहा महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.
कराटे प्रशिक्षण घेतलेल्या या महिला पोलिस कर्मचाऱ्यांची शहराच्या विविध भागात दिवसभर गस्त सुरू असते. दोन दिवसात आठ जणांना चपराक देण्यात आली. हे पथक प्रामुख्याने शाळा, महाविद्यालय, संभाजी उद्यान, बसस्थानक, रेल्वे स्थानक, बडी सडक, आझाद मैदान या भागात कार्यरत राहत आहे.
पथकाची कुमक वाढविण्यासाठी कमल गिरी यांच्यासह सुमित्रा अंभोरे, संजीवनी गाढे, माधुरी फुके, प्रीती जाधव, अर्चना आधे, गोदावरी सरोदे, ज्योती राठोड, सुरेखा जाधव, रिना मेहेर, मेघा नागलोत,सीमा देठे आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
रस्त्यावर रेंगाळणाऱ्यांना चपराक
शाळा-महाविद्यालय सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या पथकाने सी.टी.एम.के. गुजराती विद्यालय, सरस्वती भुवन प्रशाला, दानकुँवर कन्या विद्यालय, महाविद्यालय, जेईएस कॉलेज, एम.एस.जैन शाळा तसेच विविध कोचिंग क्लासेसच्या परिसरात जाऊन तेथे रेंगाळत फिरणाऱ्या तरूणांना चपराक दिली.