धरण उशाला अन् कोरड घशाला
By Admin | Updated: May 25, 2014 01:03 IST2014-05-25T00:59:33+5:302014-05-25T01:03:42+5:30
सुनील डोळसे , मानदेऊळगाव बदनापूर तालुक्यातील मांडवा या गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

धरण उशाला अन् कोरड घशाला
सुनील डोळसे , मानदेऊळगाव बदनापूर तालुक्यातील मांडवा या गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावालगतच जालना शहराला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी येथील तलाव आहे. त्यामुळे धरण उशाला अन् कोरड घशाला अशी गत मांडवा ग्रामस्थांची झाली आहे. काही वर्षांपासून पेयजल योजनेचे काम रखडल्याने टंचाईत भर पडली आहे. या गावाला पाणीपुरवठा करणार्या योजनांची जलवाहिनी ठिकठिकाणी फुटलेली आहे. त्यामुळे योजनेद्वारे गावाला अपुरा पाणीपुरवठा होत आहे. ग्रामस्थांना घाणेवाडी तलावालगत असलेल्या सार्वजनिक विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. तसेच शेतातील विहिरीवरून व हातपंपावरुन पाणी भरावे लागत आहे. गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली असतानाही ग्रामपंचायत याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. गावातील जलवाहिनी नादुरूस्त झालेली आहे. या प्रकाराकडे ग्रामसेवक व सरपंच दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे. नादुरूस्त जलवाहिनीची तात्काळ दुरूस्ती करावी व गावाला सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी १९८६ साली जि. प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने घाणेवाडी तलावा लगत असलेल्या विहिरीवरून जलवाहिनीद्वारे गावाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र ही जलवाहिनी जुनी झाल्याने जागो- जागी गळती लागली आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. अनेकवेळा तिची दुरूस्ती करूनही गळतीचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे कड यांनी सांगितले.गावातील पाण्याची समस्या सुटावी म्हणून राष्ट्रीय पेयजेल योजनेतंर्गत मांडवा, गायरान वाडी, गवळवाडी या तीन ठिकाणी जलकुंभ, घाणेवाडी तलावा लगत नवीन विहीर खोदणे आदी विविध कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो दोन दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे सादर करणार असल्याचे ग्रामसेवक एम. डी. कड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.