दलित वस्ती सुधार योजना राजकीय कचाट्यात
By Admin | Updated: June 26, 2017 00:14 IST2017-06-26T00:11:29+5:302017-06-26T00:14:40+5:30
नांदेड: शहरी भागातील दलित वस्ती सुधार योजनेतून प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या तब्बल ९ कोटींच्या कामांना पालकमंत्र्यांच्या आदेशावरून थांबविण्यात आले आहे़

दलित वस्ती सुधार योजना राजकीय कचाट्यात
अनुराग पोवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शहरी भागातील दलित वस्ती सुधार योजनेतून प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या तब्बल ९ कोटींच्या कामांना पालकमंत्र्यांच्या आदेशावरून थांबविण्यात आले आहे़ परिणामी शहरातील अनेक दलित वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांची कामे ठप्प झाली आहेत़ याविरोधात आता न्यायालयात जाण्याची तसेच रस्त्यावर आंदोलनाचा इशारा मनपातील सत्ताधाऱ्यांनी दिल्ोा आहे़
महापालिकेला २०१६-१७ या आर्थिक वर्षात १६ कोटी ८६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे़ या निधीतून महापालिकेने निश्चित केलेल्या ११९ कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत़ ११ मे २०१७ रोजीच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ९ कोटी ९ लाख ९२ हजारांच्या ६८ कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती़ मात्र मंजुरी दिलेल्या कामांपैकी काही कामे ही दलित वस्ती बाहेरची असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या़ तसेच काही कामांमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या़ पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी या तक्रारींची तत्काळ दखल घेत मंजूर झालेल्या कामांची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले़ ही चौकशी पूर्ण होईपर्यंत निविदा काढण्यात येवू नयेत, असेही आदेश पारित केल्याने ९ कोटींची कामे खोळंबली आहेत़
दलित वस्ती निधीतील कामांची चौकशी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे़ यासाठी जिल्हास्तरावर नगररचना कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मदतीने आवश्यक ती तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशित केले आहे़ ही चौकशी अद्याप सुरू झाली की नाही ही बाब गुलदस्त्यात असली तरी पालकमंत्री खोतकर यांच्या प्रत्येक नांदेड दौऱ्यात या विषयावर चर्चा होते़ अन् हा प्रश्न लवकरच निकाली काढू असे आश्वासन पालकमंत्र्यांकडून देण्यात येते़ त्याचवेळी दलित वस्ती कामांना प्रशासकीय मंजुरी देणाऱ्या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारीच आहेत़ त्यामुळे स्वत:च मंजुरी दिलेल्या कामांची चौकशी करण्याची वेळ जिल्हाधिकाऱ्यांवर आली आहे़
दलित वस्तीच्या पहिल्याच टप्प्यातील ९ कोटींच्या ६८ कामांना राजकीय ग्रहण लागल्याने अन्य कामे तर रखडलीच आहेत़ या सर्व पार्श्वभूमीवर आता आंदोलनाची तयारी काँग्रेस नगरसेवकांकडून केली जात आहे़ रस्त्यावरील लढाईसह न्यायालयीन लढाईचाही अवलंब केल्या जाईल, अशी माहिती काँग्रेसचे सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी दिली आहे़