निधीसाठी विद्यानगरला केले दलित वस्ती
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:19:29+5:302014-06-14T01:20:23+5:30
औरंगाबाद : महापौर कला ओझा यांचा वॉर्ड हा दलित वस्ती असून त्यामध्ये ५० लाख रुपयांचा विकास निधी मिळावा, असा ठराव ६ जून २०१३ रोजी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

निधीसाठी विद्यानगरला केले दलित वस्ती
औरंगाबाद : महापौर कला ओझा यांचा वॉर्ड हा दलित वस्ती असून त्यामध्ये ५० लाख रुपयांचा विकास निधी मिळावा, असा ठराव ६ जून २०१३ रोजी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. महापौरांनीच तो ठराव सभेमध्ये आणला होता.
नगरसेवक गिरजाराम हाळनोर, वीरभद्र गादगे यांच्या अनुमोदनाने तो ठराव मंजूर करून निधी वळविण्यात आल्याचा आरोप नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनी केला. दलित वस्त्यांमध्ये विकासकामे करण्यासाठी निधी दिला जात नाही आणि महापौर आपल्या वॉर्डाला दलित वस्ती असल्याचे सांगून निधी पळवीत असल्याचेही ते म्हणाले. याप्रकरणी खुलासा करताना महापौर कला ओझा म्हणाल्या, वॉर्डांची पाहणी सुरू होती. त्यावेळी विद्यानगरची पाहणी करण्यात आली. विद्यानगर या वॉर्डात दलित वस्ती नाही; परंतु काही भाग वॉर्डात येतो. त्यासाठी निधीची मागणी केली होती. मात्र, निधी मिळाला नाही. ती संचिका परत आली. नगरसेवक दाभाडे यांच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचा दावाही त्यांनी केला.
विद्यानगर उच्चभू्र वसाहत
महापौरांच्या वॉर्डाचे नाव विद्यानगर, गजानन कॉलनी असे आहे. जालना रोडपासून त्यांचा वॉर्ड सुरू होतो. सुरुवातीलाच विद्यानगर, राणानगर हा परिसर लागतो. उच्चभू्र वसाहतींचा बराचसा भाग महापौरांच्या वॉर्डात येतो.
दलित वस्तीचे निकष
ज्या वॉर्डामध्ये ५० टक्के लोकसंख्या दलित आहे. त्या वॉर्डात दलित वस्ती विकास निधीतून विकासकामे केली जातात. त्या वस्त्यांना निधी दिला जातो, असे निकष शासनाने लावलेले आहेत.