वाहन शोरूमध्ये दलालांची दादागिरी
By Admin | Updated: November 18, 2015 00:41 IST2015-11-18T00:18:28+5:302015-11-18T00:41:13+5:30
सोमनाथ खताळ , बीड सर्वसामान्यांसाठी वाहन घेणे सोपे झाले आहे परंतु वाहनांची नोंदणी आणि रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया किचकट आणि एजंटांचे खिसे भरणारी बनले आहे.

वाहन शोरूमध्ये दलालांची दादागिरी
सोमनाथ खताळ , बीड
सर्वसामान्यांसाठी वाहन घेणे सोपे झाले आहे परंतु वाहनांची नोंदणी आणि रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया किचकट आणि एजंटांचे खिसे भरणारी बनले आहे. वाहनांच्या शो-रूममध्येच पासिंग करणे सुरू असल्याने याठिकाणी असलेल्या एजंटांनी ग्राहकांना लुटण्यास सुरूवात केली आहे. या सर्व गोष्टींकडे शोरूम मालक दुर्लक्ष करीत असल्याने ग्राहकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. दलालांच्या या दादागिरीला शोरूम मालकांनी आवर घालावा, अशी मागणी होत आहे.
दुचाकी वाहन ही सध्या गरजेची वस्तू बनली आहे. प्रत्येकाला आपल्या दुचाकी किंवा इतर वाहन असावे, असे वाटू लागले आहे. अनेकजन रात्रं-दिवस मेहनत घेऊन वाहन खरेदी करण्यासाठी पै-पै जमा करून आपल्या दारासमोर दुचाकी किंवा चारचाकी वाहन उभे करतात. परंतु कष्टाच्या पैशातून खरेदी केलेल्या वाहनाची नोंदणी करण्यासाठी शोरूमधील दलालांची फुकट दादागिरी सहन करण्याची वेळही या सर्वसामान्य वाहनधारकांवर आली आहे. पासिंगसाठी ग्राहकांना हेलपाटे मारायला लावणे, त्यांच्या अंगावर खेकसणे, गरज असेल तर नोंदणी करा नाही तर निघा येथून, असे उध्दटपणे बोलण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. नव्यानेच सुरू झालेल्या एका दुचाकीच्या शोरूममध्ये तर एका एजंटाने तर ग्राहकांची लूटमार करण्याचा ‘कारवा’ खुलेआम सुरूच ठेवला आहे.
दुचाकी, कार हे खाजगी वाहन
दुचाकी किंवा कार ही वाहने खाजगी असतात, असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे म्हणणे आहे. म्हणून या वाहनांची नोंदणी शोरूम मालकांकडूनच करून घेणे बंधनकारक आहे. परंतु नोंदणी करण्यासाठी गेल्यावर शोरूम मालक आणि दलाल हे सर्वसामान्य वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे समोर आले आहे.
दुचाकी नोंदणीसाठी ५०० रूपये
एका दुचाकीची नोंदणी करण्यासाठी वाहनधारकांकडून हे दलाल ४०० ते ५०० रूपये वसूल करीत असल्याचे समोर आले आहे. वास्तवीक पाहता नियमानुसार दुचाकीची नोंदणी करण्यासाठी केवळ १६० रूपये लागत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अ.अ.खान यांनी सांगितले.