फटाके कारखान्यावर दिवसाढवळ्या दरोडा
By Admin | Updated: December 20, 2015 23:50 IST2015-12-20T23:46:18+5:302015-12-20T23:50:18+5:30
तेरखेडा : फटाके कारखान्यावर गावातीलच सहा ते सातजणांनी भर दिवसा दरोडा टाकून पाऊण लाखांचा ऐवज पळवून नेल्याची घटना वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे

फटाके कारखान्यावर दिवसाढवळ्या दरोडा
तेरखेडा : फटाके कारखान्यावर गावातीलच सहा ते सातजणांनी भर दिवसा दरोडा टाकून पाऊण लाखांचा ऐवज पळवून नेल्याची घटना वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून एकास अटक केली असून, गुन्ह्यातील मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, शनिवारी दुपारी तेरखेडा येथील जे. के. फायर वर्क्स या फटाके बनविणाऱ्या कारखान्यात कामगार काम करीत होते. तर कारखान्याचे मालक हे बाहेर गेलेले होते. यावेळी गावातील सहा ते सातजण एमएच १३/ बीएन ४१११ या क्रमांकाच्या कारमधून या कारखान्यावर आले. यावेळी त्यांनी दुकानाचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला. तसेच आतमध्ये काम करीत असलेल्या कामगारांना मारहाण करून डांबून ठेवले व आतील सुमारे ७० ते ७५ हजार रुपये किंमतीचा फटाक्यांचा माल घेऊन पोबारा केला. यावेळी कारखान्यात काम करणाऱ्या लतिब मुलाणी, शिवाजी कसबे, विजय जोशी या कामगारांना दरोडेखोरांकडून मारहाण झाली. दरोडेखोर गेल्यानंतर कामगारांनीच कारखान्याचे मालक जमीलभाई कादरभाई दारूवाले यांना भ्रमणध्वनीद्वारे या घटनेची माहिती दिली. यानंतर ते कारखान्यावर गेले व तेथून येरमाळा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी दारूवाले यांच्या फिर्यादीवरून चंद्रकांत पौळ, सचिन शिवाजी उकरंडे, अविनाश मिटू हलकरे, संभाजी दिलीप हालकरे यांच्यासह इतरांविरूध्द भादंवि कलम ३९५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास पोनि सिध्दे करीत आहेत. दरम्यान, रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. यावेळी कळंबचे उपविभागीय पोलिस अधिकारी चिलवंत ढवळे हेही उपस्थित होते. (वार्ताहर)
भूम : खोलीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना भूम तालुक्यातील वालवड येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, वालवड येथे वाल्हा रोडवर अनिल मारूती मदने यांचे घर आहे. शनिवारी रात्री ते घरात झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या बाजुला असलेल्या खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळविला. यावेळी आतील कपाटात ठेवलेले पाच ग्रॅमचे सोन्याचे मनी, डोरले घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. रविवारी सकाळी ही चोरी निदर्शनास आल्यानंतर अनिल अतकरे यांनी भूम पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अधिक तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहेत.