शहरात उद्या १ लाख ९८ हजार बालकांना ‘दाे बूंद जिंदगी के’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:15 IST2021-02-05T04:15:48+5:302021-02-05T04:15:48+5:30
औरंगाबाद : शहरात ३१ जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरी भागातील तब्बल १ लाख ९८ हजार ...

शहरात उद्या १ लाख ९८ हजार बालकांना ‘दाे बूंद जिंदगी के’
औरंगाबाद : शहरात ३१ जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरी भागातील तब्बल १ लाख ९८ हजार २३९ बालकांना ‘दाे बूंद जिंदगी के’ देण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात तयारी केली असून, कोरोनानंतर ही पहिलीच मोहीम आहे. वर्षानुवर्षे ज्या पद्धतीने बालकांना डोस देण्यात आले आहेत, त्याचपद्धतीने ही मोहीम आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी दिली.
० ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहेत. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये डोस दिले जातील. शासनाकडून महापालिकेला २ लाख ४० हजार डोस प्राप्त झाले आहेत. ३१ जानेवारी रोजी ज्या बालकांना डोस मिळणार नाहीत, त्यांना परत प्रत्येक घरात जाऊन आरोग्य कर्मचारी डोस देतील. शहरातील प्रत्येक लसीकरण बुथवर कोरोनाचे नियम पाळण्यात येणार आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या रिक्षा लावण्यात आल्या आहेत. याशिवाय विविध ठिकाणी पोस्टर, बॅनर, होर्डिंग लावण्यात आल्याची माहिती यावेळी नेमाने यांनी दिली. नागरिकांनी आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन बाळांना डोस द्यावेत, असे आवाहनही महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. ८ ते २२ फेब्रुवारीपर्यंत तसेच ८ ते २२ मार्चपर्यंत मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येईल. यामध्ये दोन वर्षापर्यंतच्या बालकांना शहरातील ३८ केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे.
० ते ५ वयोगटातील लाभार्थी - १,९८,२३९
पोलिओ डोस प्राप्त - २, ४०,०००
एकूण बुथ - ६७८
आरोग्य कर्मचारी - १८९०
पर्यवेक्षक - १३६
अशी चालेल मोहीम...
आरोग्य संस्था - २१
मोबाईल पथके - २७
ट्रान्झीट पथके - १५
लसीकरणाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५
शासनाकडून प्राप्त पल्स पोलिओ लस
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून औरंगाबाद महापालिकेला शहरी भागासाठी २ लाख ४० हजार डोस प्राप्त झाले आहेत. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आले आहे. शहरात नेमलेल्या बुथशिवाय रेल्वे स्थानक, बस स्थानक, विमानतळ, मॉल, टोलनाके आदी ठिकाणी डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र चाळीस वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. ज्या बालकांना ३१ डिसेंबर रोजी डोस देता आले नाहीत, त्यांना नंतर पाच दिवस घरोघरी जाऊन डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. १९९९ नंतर औरंगाबाद शहरात आजपर्यंत एकही पोलिओचा रुग्ण आढळून आलेला नाही.
नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही
अनेक वर्षांपासून लहान मुलांना पोलिओ डोस देण्याची पद्धत आहे. आपल्या शेजारील दोन देशांमध्ये पोलिओचे रुग्ण आढळून आले आहेत. भविष्यात ते व्हायरस भारतातही येऊ शकतात. सावधगिरी म्हणून देशभर ही मोहीम राबविण्यात येत आहे. बाळ आजारी असेल तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार डोस देता येईल. कोरोना आणि या डोसचा काहीही संबंध नाही. पालकांनी न घाबरता बालकांना डोस द्यावेत.
- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.