पुन्हा दरोडा; लाडेगावात शेतकरी दाम्पत्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:43 IST2017-08-30T00:43:55+5:302017-08-30T00:43:55+5:30
घरासमोर झोपलेल्या शेतकरी दाम्पत्यावर सात ते आठ दरोडेखोरांनी हल्ला करून गंभीर जखमी केले.

पुन्हा दरोडा; लाडेगावात शेतकरी दाम्पत्यावर हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : घरासमोर झोपलेल्या शेतकरी दाम्पत्यावर सात ते आठ दरोडेखोरांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच महिलेच्या अंगावरील दागिन्यांसह घरातील रोख रक्कम लंपास केली. ही घटना केज तालुक्यातील लाडेगाव येथे मंगळवारी पहाटे घडली. जखमी दाम्पत्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गेवराईतील घाडगे दाम्पत्य हत्याप्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
प्रकाश ज्ञानोबा मुळे (५०) आणि सविता प्रकाश मुळे (४२) असे या मारहाण झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. प्रकाश मुळे आणि त्यांच्या पत्नी सविता हे सोमवारी रात्री घराच्या पुढे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. पहाटे तीन वाजेच्या सुमारास अंदाजे सात ते आठ दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्याकडे पैशाची मागणी करत शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि पत्नीच्या अंगावरील गंठन, नथ व घरातील रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. युसूफ वडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी प्रकाश मुळे यांच्या फिर्यादीवरून दरोडेखोरांविरूद्ध गुन्हा नोंद झाला.