विद्यापीठात कंत्राटी कामगारांची कपात
By Admin | Updated: November 2, 2014 00:23 IST2014-11-02T00:13:21+5:302014-11-02T00:23:17+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने आज १ नोव्हेंबरपासून निम्म्या कंत्राटी कामगारांची कपात केली.

विद्यापीठात कंत्राटी कामगारांची कपात
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने आज १ नोव्हेंबरपासून निम्म्या कंत्राटी कामगारांची कपात केली. यामध्ये स्वच्छता कर्मचारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत मात्र समितीचा अहवाल आल्यानुसार कारवाई केली जाईल, असे कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी सांगितले.
यासंदर्भात कुलसचिव माने यांनी सांगितले की, औरंगाबादेतील स्पार्कलीन व आयएसएफ या दोन खाजगी संस्थांकडून कंत्राटी कामगारांची भरती करण्यात आली होती. यापैकी स्पार्कलीन संस्थेमार्फत विद्यापीठातील सर्व विभाग, प्रयोगशाळा, उद्याने व परिसर स्वच्छतेसाठी ११८ कंत्राटी कामगार नेमले होते. त्यापैकी ६६ स्वच्छता कामगार १ नोव्हेंबरपासून तडकाफडकी कमी करण्यात आले.
विद्यापीठ परिसराची निकड लक्षात घेऊन आता अवघ्या ५२ कंत्राटी कामगारांमार्फत स्वच्छतेचे काम करून घेतले जाणार आहे. दुसरीकडे ‘आयएसएफ’ या संस्थेकडून सुरक्षा व रोजंदारी कर्मचाऱ्यांचा विद्यापीठाला पुरवठा होता. विद्यापीठातील प्रशासकीय इमारत, परीक्षा विभाग, विविध शैक्षणिक विभाग, प्रयोगशाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, कुलगुरू, कुलसचिवांचा बंगला, वसतिगृहे आदी ठिकाणी प्रत्येक पाळीमध्ये ४० कर्मचारी याप्रमाणे तीन पाळ्यांमध्ये १२० सुरक्षा कर्मचारी तैनात केले जात होते.