दारूच्या नशेत मित्राचा काढला काटा
By Admin | Updated: June 5, 2014 00:50 IST2014-06-05T00:24:07+5:302014-06-05T00:50:31+5:30
गोलापांगरी : सोबत दारू पिल्यानंतर मित्राच्या खिशातील ३ ते ४ हजार रूपये हिसकावून घेण्यासाठी केलेल्या बेदम मारहाणीत श्यामराव लक्ष्मण चौगुले यांचा मृत्यू झाला.

दारूच्या नशेत मित्राचा काढला काटा
गोलापांगरी : सोबत दारू पिल्यानंतर मित्राच्या खिशातील ३ ते ४ हजार रूपये हिसकावून घेण्यासाठी केलेल्या बेदम मारहाणीत श्यामराव लक्ष्मण चौगुले यांचा मृत्यू झाला. मात्र घटनेतील आरोपींचा शोध देशी दारूच्या दुकानातील सी.सी.टी.व्ही. फुटेजवरून लागला. आरोपी सध्या फरार आहेत. ३० मे २०१४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अविनाश आठवले, कोंडीराम गुलाब हतागडे, राहुल सीताराम येडे व मयत श्यामराव लक्ष्मण चौगुले (५०) या चौघांनी गोलापांगरी गावातील देशी दारूच्या दुकानात मद्यप्राशन केले. त्यावेळी श्यामराव चौगुलेच्या खिशात ३ ते ४ हजार रुपये होते. ही रक्कम त्यांच्याकडून हिसकावून घेण्यासाठी तिघांनी श्यामरावला दुधना नदीच्या पात्रात नेले. पात्रात नेल्यानंतर त्यांना तिघांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत श्यामराव गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. मारहाण करणारे अविनाश आठवले, कोंडीराम हतागळे व राहूल येडे पळून गेले. दुपारी १ वाजेच्या सुमारास मारहाण केल्यानंतर हा प्रकार सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. गावातील एक जण सायंकाळच्यावेळी नदीच्या पात्रात गेला असता त्याला श्यामराव चौगुले जखमी अवस्थेत दिसले. त्यांनी याप्रकरणाची माहिती गावातील काही लोकांना दिली. नातेवाईकांनी जखमी श्यामराव यांना तात्काळ जालना येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. तर अधिक उपचारासाठी १ जून रोजी औरंगाबाद येथील घाटी दवाखान्यात हलविण्यात आले. औषधोपचार सुरू असतांना ४ जूनच्या पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ३० मेच्या दुपारी देशी दारूच्या दुकानात बसविण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेर्याचे फुटेज तपासून तिघा आरोपींची चौकशी करण्यास सुरूवात केली. मात्र श्यामराव चौगुले यांचे निधन होताच संबंधित तिघेही गावातून गायब झाले. पोलिस त्यांचा तपास करीत असल्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठलचंद्र काळे यांनी सांगितले. याप्रकरणी मयताचा भाचा नंदकुमार मेहेत्रे यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलिस ठाण्यात तिघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.दुसर्या घटनेत कामगाराचा खूनजालना : येथील औद्योगिक वसाहत भागात चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना ३ जून रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. एका स्टील कामगारांची निवासस्थाने असलेल्या या परिसरात दोन कामगार शौचासाठी गेले होते. त्यात मूळचे गेंगटा (ता.बासी, जि. सिद्धार्थनगर) येथील मोलू भारत मौर्या व गंगाबिदा (ता.रजोली जि. नवाडा, बिहार) येथील संजय गुलाबीप्रसाद यादव या कामगारांचा समावेश होता. दोन चोरटे मोटारसायकलवरून त्याठिकाणी आले. चोरट्यांनी धारदार शस्त्राने वार करून संजय यादव यांचा खून केला. तर मोलू मौर्या यालाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर खिशातील एक हजार रुपये घेऊन पसार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.