ग्राहक म्हणून प्रत्येक व्यक्तीने हक्कासाठी झगडलेच पाहिजे
By Admin | Updated: December 26, 2016 23:57 IST2016-12-26T23:51:21+5:302016-12-26T23:57:28+5:30
लातूर : प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक व विक्रेता असतो. ग्राहक म्हणून व्यक्तीने आपल्या हक्कासाठी झगडलेच पाहिजे.

ग्राहक म्हणून प्रत्येक व्यक्तीने हक्कासाठी झगडलेच पाहिजे
लातूर : प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक व विक्रेता असतो. ग्राहक म्हणून व्यक्तीने आपल्या हक्कासाठी झगडलेच पाहिजे. व्यापारी व सेवा पुरवठादारांच्या सेवांबाबत कमतरता असल्यास ग्राहकांनी त्याबाबतच्या तक्रारी तत्काळ नोंदविण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त टाऊन हॉल ग्रंथालय येथे आयोजित चर्चासत्र व शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त रमेश पवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक लता फड, जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष प्रदीप निटुरकर, सदस्य अजय भोसरेकर, तहसीलदार संजय वारकड, अॅड. महेश ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी पोले म्हणाले, ग्राहकांनी शिथिलता झटकून ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती घ्यावी व त्याप्रमाणे सेवा प्राप्त होत नसतील तर संबंधितांच्या तक्रारी ग्राहक मंचाकडे द्याव्यात, तसेच व्यापारी व सेवा पुरवठादार संस्थांनी कार्यक्षमपणे वस्तू व सेवांचा पुरवठा ग्राहकांनी केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे सदस्य भोसरेकर यांनी राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायद्याची उपस्थितांना सविस्तर माहिती देऊन प्रत्येकाने या कायद्याबाबत माहिती घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आवाहन केले. तर ग्राहक पंचायतचे अध्यक्ष भराडिया यांनी ‘जय ग्राहक शक्ती’ हे गीत गायिले. तहसीलदार संजय वारकड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अव्वल कारकून मंजूर पठाण यांने केले. पुरवठा अधिकारी सुरेश पाटील यांनी आभार मानले.