‘पेट’ च्या निकालाची उत्सुकता
By Admin | Updated: October 6, 2014 00:44 IST2014-10-06T00:32:48+5:302014-10-06T00:44:31+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या संशोधनपूर्व परीक्षा (पेट) होऊन ८ दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप वेबसाईटवर ‘अन्सर की’ अपलोड झालेली नाही,

‘पेट’ च्या निकालाची उत्सुकता
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या संशोधनपूर्व परीक्षा (पेट) होऊन ८ दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप वेबसाईटवर ‘अन्सर की’ अपलोड झालेली नाही, तेव्हा निकाल जाहीर कधी होईल, अशी उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
विद्यापीठाने २००९ मध्ये पहिली ‘पेट’ घेतली. त्यानंतर २०१२ साली दुसरी ‘पेट’ झाली. तेव्हापासून या परीक्षेला मुहूर्तच लागलेला नव्हता. विद्यापीठात संशोधनाची प्रक्रिया ठप्प झाली होती. जूनमध्ये डॉ. बी. ए. चोपडे यांनी कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी ‘नावीन्यपूर्ण संशोधनावर’ भर दिलेला आहे. प्रलंबित ‘पेट-३’ घेऊन यापुढे वर्षातून किमान दोन वेळा ती परीक्षा घेण्याचा निर्धारही केला आहे.
शिवाय यापुढे एकदा ‘पेट’ उत्तीर्ण झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने पुन्हा ही परीक्षा न देता जोपर्यंत त्याला मार्गदर्शक मिळत नाही, तोपर्यंत परीक्षेची ‘व्हॅलीडिटी’ कायम ठेवण्याचा धोरणात्मक निर्णयही कुलगुरूंनी घेतला आहे.
दरम्यान, तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २८ सप्टेंबर रोजी शहरातील १७ केंद्रांवर ‘पेट’ घेतली. एकूण ५३ विषयांसाठी ९ हजार २३० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केलेली होती. त्यापैकी प्रत्यक्षात ५ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तब्बल ४० टक्के (३४११) विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थितीत होते. परीक्षा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी विद्यापीठाच्या वेबसाईटवर ‘अन्सर की’ अपलोड करण्याचे प्रशासनाने जाहीर केले होते, तर ८ दिवसांच्या आत निकाल जाहीर करण्याचा निर्धार केला होता. परीक्षा होऊन ८ दिवसांचा कालावधी लोटला; पण अजूनही विद्यापीठाने ना ‘अन्सर की’ अपलोड केली, ना निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागलेली आहे.