कोम्बिंग आॅपरेशनचा मुहूर्त हुकला !

By Admin | Updated: August 2, 2014 01:43 IST2014-08-02T01:41:10+5:302014-08-02T01:43:04+5:30

औरंगाबाद : सिडको-हडकोतील एन-९, एन-११ या परिसरात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आढळून येत

Cumbing Operation Hookala! | कोम्बिंग आॅपरेशनचा मुहूर्त हुकला !

कोम्बिंग आॅपरेशनचा मुहूर्त हुकला !

औरंगाबाद : सिडको-हडकोतील एन-९, एन-११ या परिसरात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने मनपाने शुक्रवारी दोन टप्प्यात फवारणी, औषधी वाटप केली. १४ कंत्राटी आणि १४ मनपा कर्मचाऱ्यांच्या जीवावर सुमारे १० हजार मालमत्तांमध्ये अबेट औषधी वाटप करण्याची मोहीम सकाळी सुरू करण्यात आली. नवजीवन कॉलनी, मयूरनगर, दीपनगर, यादवनगर या वसाहतींमध्ये औषधी वाटप झाल्याचा दावा मनपाने केला. शुक्रवारचा कोम्बिंग आॅपरेशनचा मुहूर्त हुकला.
५०० कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या दोन्ही वॉर्डांमध्ये कोम्बिंग आॅपरेशन करण्याचे काल ३१ रोजी जाहीर करण्यात आले. मात्र, शुक्रवारी तसे कोणतेही आॅपरेशन झाले नाही. २ आॅगस्टपासून कोम्बिंग आॅपरेशन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मनपा एसएसडब्ल्यू टीमचे राहुल चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज सकाळपासून फॉगिंगला सुरुवात केली. ६ ते ७.३० वाजेपर्यंत फॉगिंग करण्यात आले. त्यानंतर औषधी फवारणी करण्यात आली. ९ ते १० आणि दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत अबेट औषधींचे वाटप करण्यात आले. ६ फॉगिंग मशीनने धूरफवारणी करण्यात आली. डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यात मनपाला यश येत असल्याचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर यांनी सांगितले.
२०० च्या वर रुग्ण; एक गंभीर
डेंग्यूसदृश म्हणा किं वा व्हायरल फिव्हर; पण एन-९ आणि एन-११ मधील वसाहतींमध्ये असलेल्या लहान-मोठ्या दवाखान्यांमध्ये सुमारे २०० च्या आसपास तापेने फणफणलेले रुग्ण आढळून आले आहेत. अश्विनी बोलकर, स्वराज कुंटे, योगेश मिरगे, बालाजी फंड यांचा बळी डेंग्यूने घेतला आहे. एका दीड वर्षाच्या मुलीच्या पांढऱ्या पेशी ३० हजारांवर आल्या असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
या कंत्राटदारांची बिले थांबविली
औषधी फवारणी करणाऱ्या सहा संस्थेची बिले थांबविली आहेत. वॉई ‘ई’ मधील गणेश पेस्ट कंट्रोल भारत पेस्ट कं ट्रोल, ‘ब’ मधील भारत पेस्ट कंट्रोल, आर. डी. पेस्ट कं ट्रोल, सचिन पेस्ट कंट्रोल, नीलेश पेस्ट कंट्रोल, पूर्णेश्वर पेस्ट कंट्रोल यांची बिले थांबविण्यात आली आहेत. त्यांच्याकडे ४६ कर्मचारी आहेत, ३० स्पे्रपंप आहेत. १२ फॉगिंग मशिन्स आहेत, असा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे.
एका कर्मचाऱ्याला १५० घरे
अबेट वाटपासाठी एका कर्मचाऱ्यावर १५० घरांची जबाबदारी होती. अबेट ही औषधी वापरायच्या पाण्यात टाकल्यानंतर डासांची अंडी नष्ट होतात. प्रत्येक घरामध्ये ती औषधी देणे हा प्राथमिक उपाय असतो. मात्र, काही नागरिकांनी कर्मचाऱ्यांना औषधी पाण्यात टाकण्यास विरोध केला. काही इमारतींवरील पाण्याच्या टाक्यांची झाकणे उघडी दिसून आली. त्या टाक्यांमध्येही डेंग्यू डासांची अंडी दिसून आली.
४० लिटर औषधी
डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपाने आज ४० लिटर औषधींचा वापर केला. घाण पाण्याच्या डबक्यांवर ३० लिटर एमएल आॅईल फवारले. या आॅईलमुळे डबक्यांवरील डासांची अंडी नष्ट होतात. अडीच लिटर पॅरेथॉम ही औषधी फवारणीसाठी वापरली. तर ५ पंपांना ४ लिटर व्हेटोबॅग ही औषधी फवारणीसाठी दिली. दोन वॉर्डांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात मनपाने पहिल्यांदाच औषधी वापरली आहे.
४ हजार घरांमध्ये वितरण
पालिकेच्या पथकाने ४ हजार घरांमध्ये औषधींचे वाटप केल्याचा दावा केला आहे. फॉगिंगसह औषधी वाटप, जनजागृती केल्याचे मनपाने म्हटले आहे. चौघांचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला असून, आता कुठे पालिकेला उपाययोजना करण्याबाबत जाग आली आहे. सिडकोत एकूण ४० हजारांच्या आसपास मालमत्ता आहेत. त्यामुळे पालिकेला वॉर्डनिहाय मोहीम राबविण्याची गरज आहे.
काय करता येईल
साथरोगांचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वत:च याबाबत सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. घराशेजारी साचलेली डबकी, घाण, कचरा, वापरण्याचे स्वच्छ; परंतु उघडे असलेले पाणी डेंग्यू व इतर साथरोगांचा फैलाव होण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
साथरोगांचा प्रसार सुरू झाल्यापासून नागरिक घरातील रांजण, माठ रिकामे करीत आहेत. मात्र, कोरडा दिवस पाळणे शक्य नसल्याचे नागरिकांनी सांगितले. आहे ते पाणी फेकून दिल्यास दुसरे पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न त्यांच्या समोर आहे.
डेंग्यू प्रसाराचे मूळ स्वच्छ पाण्याच्या साठ्यात
औरंगाबाद : सिडको- हडको भागासह शहरातील बहुतांश भागांमध्ये डेंग्यू व इतर साथरोगांचा प्रसार वेगाने होतो आहे. मनपा सुरळीत पाणीपुरवठा करीत नसल्यामुळे चार-चार दिवस साठवलेल्या उघड्या पाण्यात डेंग्यूचे डास आढळून येत आहेत. डेंग्यूसदृश आजार हा डास चावल्यामुळे होतो व त्या डासाची अंडी स्वच्छ पाण्यात होतात. त्यामुळे सध्या
साथरोग पसरण्यासाठी महापालिका दोषी असल्याचे यातून दिसते आहे.
पाणी फेकले तरीही अडचण आणि साठवून ठेवले तर जीवावर बेतण्याची भीती. अशा द्विधा मन:स्थितीत औरंगाबादकर अडकले असून, यावर अबेट वाटप हाच एकमेव उपाय मनपासमोर आहे. मनपाने ती औषधी वापरण्यासाठी यंत्रणा लावली आहे. मात्र यंत्रणा देखील तोकडी पडते आहे. डेंग्यू व साथरोगांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मनपाकडे कोम्बिंग आॅपरेशनचे नियोजन आहे, मात्र ते नियोजन सध्या कागदावरच आहे.

Web Title: Cumbing Operation Hookala!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.