सांस्कृतिक वैविध्याचे मनोहारी दर्शन!
By Admin | Updated: February 14, 2015 00:12 IST2015-02-14T00:02:36+5:302015-02-14T00:12:42+5:30
कलाग्रामचा खुला रंगमंच शुक्रवारी भारतातील विविधतेतील एकतेचे मनोहारी दर्शन घडविणारा ठरला.

सांस्कृतिक वैविध्याचे मनोहारी दर्शन!
औरंगाबाद : काश्मीरच्या रौफ नृत्यातील गौरवर्णी कन्यकांची अदा, डोगरी नृत्यातील मिश्कील खट्याळपणा, तेलंगणाच्या माधुरी नृत्यातील लय- तालमाधुर्य, बस्तरच्या गोंड जमातीने केलेल्या काकसार नृत्यातील ठसकेबाजपणा, पहाडी भाषेतील जिंदा गीतासह बांसरीची गोड सुरावट.... कलाग्रामचा खुला रंगमंच शुक्रवारी भारतातील विविधतेतील एकतेचे मनोहारी दर्शन घडविणारा ठरला.
कलाग्राममध्ये आयोजित तीनदिवसीय कला महोत्सवाचे शुक्रवारी थाटात उद्घाटन झाले. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, नागपूरचे दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव साजरा होतो आहे.
विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक अजय अंबेकर, जम्मू-काश्मीरच्या सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक डॉ. अरविंदसिंग अमन, पालिका आयुक्त प्रकाश महाजन, लेखाधिकारी विश्वनाथ साळवी उपस्थित होते.
शहरातील देवमुद्रा ग्रुपने सादर केलेल्या ‘विठ्ठल तुकयाचा’ या देखण्या नृत्यनाट्याने झालेली सुरुवात उत्तरोत्तर रंग भरत गेली. संत तुकारामांचा जीवनपट यातून प्रभावीपणे उभा राहिला. जम्मू-काश्मीरच्या तरुणींनी सादर केलेल्या रौफ व धमाली या नृत्यांमधील वेधक रंग, अदाकारी व संतूर, रुबाब, सारंगी, तुंबकनारी ही लोकवाद्ये वैशिष्ट्यपूर्ण ठरली. मोहम्मद इस्माईल मीर यांच्या ‘दास्तान’ गायकीतून काश्मिरी गानवैभवाची प्रचीती मिळाली. छत्तीसगडच्या काकसार लोकनृत्यातील घुंगरांच्या मधुर बोलांनी संध्याकाळ सुरेल केली.