श्रावणात घन निळा बरसला
By Admin | Updated: August 22, 2014 00:22 IST2014-08-22T00:11:15+5:302014-08-22T00:22:53+5:30
नांदेड: यंदाच्या पावसाळ्यात सर्वच नक्षत्रांनी हुलकावणी दिल्यामुळे चिंतातूर झालेल्या शेतकऱ्यांना श्रावण सोमवारी दुपारी झालेल्या दोन तास पावसाने दिलासा मिळाला़

श्रावणात घन निळा बरसला
नांदेड: यंदाच्या पावसाळ्यात सर्वच नक्षत्रांनी हुलकावणी दिल्यामुळे चिंतातूर झालेल्या शेतकऱ्यांना श्रावण सोमवारी दुपारी झालेल्या दोन तास पावसाने दिलासा मिळाला़ या पावसाळ्यातील हा पहिलाच जोरदार पाऊस होता़ दरम्यान, नांदेडात रविवारी रात्री झालेल्या पावसाची १६ मि़ मी़ नोंद करण्यात आली़
चार नक्षत्र कोरडे गेल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या़ तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ गतवर्षीच्या तुलनेत ५९२ मि़ मी़ पाऊस कमी आहे़ मागील वर्षी १ जून ते १० आॅगस्ट या काळात ७४७ मि़ मी़ तर यावर्षी आतापर्यंत केवळ १५५ मि़ मी़ पाऊस झाला आहे़ पुनर्वसू नक्षत्रात दोन वेळेस पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ मात्र रिपरिपीमुळे पावसाची नोंद वाढण्यास तयार नव्हती़ दमदार पाऊस बरसत नसल्यामुळे चिंता वाढली होती़
श्रावणात तरी पाऊस पडेल अशी अपेक्षा होती़ मात्र दररोज कोरडे आभाळ व उकाड्यामुळे नागरिक हैराण होते़ सोमवारी दुपारपर्यंत कडक उन्हामुळे चांगलाच उकाडा जाणवत होता़ मात्र आश्लेषा नक्षत्राच्या अखेरीस पावसाने हजेरी लावून सर्वांना आनंदी केले़ नांदेडकर सोमवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्रावणधारात चिंब भिजले़ दोन तास झालेल्या या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले होते़ तर तुडुंब भरलेल्या नाल्यातील पाणी रस्त्यावरून वाहत होते़ त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच अडचण झाली़ मालेगाव रोडवरील सिद्धांतनगर पाटीजवळ नेहमीप्रमाणे गुडघाभर पाणी साचले होते़ या पाण्याचा निचरा होण्यास अवधी लागत असल्यामुळे दोन तास या रस्त्यावर पाणी साचले होते़ वाहनधारकांना या पाण्यातून मार्ग काढावा लागला़ मात्र हा पाऊस उत्तर नांदेड भागातच बरसला़ तरोडा भागात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली़ (प्रतिनिधी)