महागाईच्या आगीत मालमत्ता कराचे तेल

By Admin | Updated: March 17, 2015 00:41 IST2015-03-17T00:24:39+5:302015-03-17T00:41:51+5:30

नागेश काशिद ,परंडा महागाईने होरपळून निघालेल्या परंडा शहरवासियांना पालिकेने मालमत्ता कर आकारणीत वाढ करून मोठा झटका दिला आहे. २०१५ ते २०१८-१९ या वर्षाकरिताच्या वाढीव मालमत्ता

Crude oil in inflation's fire | महागाईच्या आगीत मालमत्ता कराचे तेल

महागाईच्या आगीत मालमत्ता कराचे तेल


नागेश काशिद ,परंडा
महागाईने होरपळून निघालेल्या परंडा शहरवासियांना पालिकेने मालमत्ता कर आकारणीत वाढ करून मोठा झटका दिला आहे. २०१५ ते २०१८-१९ या वर्षाकरिताच्या वाढीव मालमत्ता कराच्या नोटिसा पालिकेने शहरवासियांना बजावल्या आहेत. यात काहींना तिप्पट तर काहींना त्यापेक्षाही अधिक कर लावण्यात आलेला असल्याने शहरवासियांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नगर परिषदेच्या वतीने दर चार वर्षांनी मालमत्ता कराची फेरआकारणी केली जाते. सन २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षांकरिता एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून शहरातील मालमत्तेचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार पालिकेने मालमत्ताधारकास नवीन वाढीव कर आकारणीच्या या नोटिसा बजावल्या आहेत. सदर नोटिसा पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला. शहरातीलच मंदा पंडित हे पूर्वी ६३९० रुपये मालमत्ता कर भरत होते. त्यांना आता ७५ हजार ५२४ रुपये मालमत्ता कर भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. याबरोबरच मेघा नलावडे यांनी मागील वर्षी १ हजार ५० मालमत्ता कर भरला होता. त्यांना दुपटीहून जास्त म्हणजेच २६०० रुपये मालमत्ता कर भरण्याची नोटीस आली आहे. नागनाथ विटकर यांचीही व्यथा अशीच आहे. त्यांनी मागील वर्षी ७३३ रुपये कर भरला होता. यावर्षी त्यांना २१७८ रुपयांची प्रस्तावित कर आकारणी करण्यात आली आहे. तर अंजली पंडित यांना मागील वर्षी १८७१ रुपये कर भरला होता. त्यांना तिपटीहून अधिक म्हणजे ६ हजार ६७ रुपयांची प्रस्तावित कर आकारणी करण्यात आली आहे. सदर कराच्या नोटिसा प्राप्त झाल्यानंतर याबाबत तक्रार असल्यास नोटीस प्रसिध्द झाल्यापासून तीस दिवसांच्या आत त्या दाखल करण्यास सांगण्यात आले आहे.
शहराची भौगोलिक रचना पाहता भुईकोट किल्ल्याच्या चारही बाजुंनी शहर विस्तारले आहे. मात्र, मागील काही वर्षांत बार्शी, कुर्डूूवाडी रोड तसेच सोनारी रस्त्यावर शहराची वेगाने वाढ होत आहे. मात्र मध्यवर्ती बाजारपेठ बसस्थानक परिसरात असून, शहराच्या वाढीव वस्तीत अनेक ठिकाणी पालिकेने पुरेशा पायाभूत सुविधाही उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. वाढीव वस्तीचे हे प्रश्न असताना शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांच्याही अनेक तक्रारी आहेत. रस्ते, गटारींबरोबरच पथदिव्यांचा प्रश्नही कायम आहे. विशेष म्हणजे, पुरेसे व शुध्द पाणी पुरविण्यात पालिकेला फारसे यश आलेले नाही. त्यातच पालिकेने मालमत्ता करात तिपटीपेक्षा अधिक पटीने केलेली ही वाढ नागरिकांसाठी जाचक ठरत आहे. त्यामुळेच या विरोधात शहरवासियांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
नगर परिषदेची नोटीस प्राप्त होताच अनेकजण पालिकेमध्ये धाव घेऊन सदर प्रस्तावित कर आकारणी चुकीची असल्याचे सांगत सदरची दरवाढ पालिकेने कुठल्या आधारावर केली, अशी प्रश्नांची सरबत्ती करीत आहेत.

Web Title: Crude oil in inflation's fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.