आरटीओत वाहनधारकांची पासिंगसाठी गर्दी
By Admin | Updated: April 1, 2017 00:25 IST2017-04-01T00:24:29+5:302017-04-01T00:25:31+5:30
जालना : येथील सहायक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात शुक्रवारी दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या नोंदीसाठी मोठी गर्दी दिसून आली.

आरटीओत वाहनधारकांची पासिंगसाठी गर्दी
जालना : येथील सहायक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात शुक्रवारी दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या नोंदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. एकाच दिवसात सुमारे ४५० वाहनांची नोंद करण्यात आली. बीएस तीन हे इंजिन बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गुरूवारी व शुक्रवारी या दोन दिवसांत बहुतांश दुचाकी दालनातील वाहनांची हातोहात विक्री झाली. काहींनी दहा ते बारा हजारांची सूट दिली होती. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुमारे साडेबारा लाखांचा महसूल जमा झाल्याचे सांगण्यात आले.
हवेतील प्रदूषणाची पातळी नियंत्रित रहावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ३१ मार्चनंतर बीएस तीन इंजिन असलेली कोणतीच वाहने विक्रीवर बंदी घातली आहे. यामुळे व्रिकेत्यांकडे असलेली वाहने घेण्यासाठी दुचाकी दालनांसमोर हजारोंचा समुदाय प्रतीक्षेत होता. मात्र काही दालनांनी गुरूवारीच सर्व दुचाकींची विक्री केल्याने शुक्रवारी बीएस तीन इंजिनची एकही दुचाकी उपलब्ध नव्हती.
ज्या दुचाकींची विक्री झाली त्याची नोंद करण्यासाठी शुक्रवारी आरटीओ कार्यालयात सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. शुक्रवारी सातवाजेपर्यंत ३९८ दुचाकी तर ४० चारचाकी तर १२ हलक्या वाहनांची नोंद झाली होती. आरटीओ कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याने दुचाकींचा आकडा पाचशेपेक्षा अधिक जाण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यातून महसूलही चांगला जमा होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आरटीओ कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मोटर वाहन निरीक्षक बाळासाहेब थेटे म्हणाले, आयुक्त कार्यालयाच्या पत्रानुसार आम्ही रात्री उशिरापर्यंत बीएस ३ वाहनांची विक्री झालेल्या वाहनांची नोंदणी करण्याचे आदेश होते. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत वाहन नोंदणीचे काम सुरू ठेवल्याचे थेटे यांनी सांगितले. एकूणच बीएस ३ इंजिनमुळे शहरात दिवसभर चर्चा होती. काही मोठी वाहनांच्या दालनातही दिवसभर विचारपूस आणि खरेदीचे व्यवहार झाले. शहरासह तालुकास्थानातील दुचाकी व तीनचाकी दालनांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. भोकरदनमध्ये सुमारे शेकडो लोक दुचाकी दालनासमोर उभे होते. (प्रतिनिधी)