‘किलेअर्क’ हेरिटेज वॉकला शहरातील इतिहासप्रेमींची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:53 IST2017-09-03T23:53:38+5:302017-09-03T23:53:38+5:30
शहरातील ऐतिहासिक असलेल्या ‘किलेअर्क’ परिसरात आयोजित हेरिटेज वॉकला इतिहासप्रेमींनी गर्दी केली होती

‘किलेअर्क’ हेरिटेज वॉकला शहरातील इतिहासप्रेमींची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक असलेल्या ‘किलेअर्क’ परिसरात आयोजित हेरिटेज वॉकला इतिहासप्रेमींनी गर्दी केली होती. किले अर्कमधील सर्व वास्तूंची पाहणी केल्यानंतर इतिहासतज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी यांच्यासह इतरांनी निर्मितीपासूनचा इतिहास सांगितला.
औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे दर पंधरा दिवसांनी शहरातील वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तूंवर हेरिटेज वॉक आयोजित करण्यात येतो. आतापर्यंत पाणचक्की, बीबी का मकबरा, हिमायत बाग, औरंगाबाद लेणी, सोनेरी महाल याठिकाणी हे कार्यक्रम झाले. या रविवारी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या पण सर्वांच्या दृष्टीने अपरिचित आणि दुर्लक्षित ‘किलेअर्क’ या ऐतिहासिक वास्तूची निवड करण्यात आली. यासाठी सकाळी ७ वाजता बहुसंख्येने इतिहासप्रेमी शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय परिसरात जमा झाले होते. दख्खनचा प्रदेश काबीज करण्यासाठी आलेले औरंगजेब या ठिकाणी वास्तव्याला होते. चोहीबाजूंनी बंदिस्त तटबंदीत जागोजागी मर्दाना महाल, जनाना महाल, मोती मस्जिद, जनाना मस्जिद, कचेरी, रंगबारी, तहखाने, तोफा लावलेले बुरूज, सुभेदारी, नहरी, कारंजी, बागबगीचे याविषयीची माहिती इतिहासतज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी यांनी केली. या छोट्या किल्ल्याच्या निर्मितीसंदर्भात अनेक मतमतांतरे आहेत. सरकारच्या गॅझेटमध्ये किलेअर्कची निर्मिती १६८२ साली झाल्याची नोंद आहे; मात्र रफत कुरेशी यांनी हा दावा खोडून काढत किले ए अर्कची निर्मिती १६५९ ची असल्याचे सांगितले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कुमुद गोरे-खेर्डेकर यांनीही मनोगत व्यक्त करीत सद्य:स्थितीची माहिती दिली. यावेळी केंद्रीय पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक डॉ. शिवकांत बाजपेयी, नीलेश राऊत, अॅड. स्वप्नील जोशी, डॉ. बिना सेंगर, प्रदीप देशपांडे, नीलिमा मार्कंडेय, कुणाल खरात, किशोर निकम, डॉ. लक्ष्मण मस्के, डॉ. रमेश पेरकर, डॉ. उमेश मणियार, प्रा. सुचिता भारंबे, अमित देशपांडे, सौरभ जामकार, अजय ठाकूर, भारती ठाकूर, सुधीर कोर्टीकर, राजेंद्र जोशी, डॉ. कामाजी डक, संजय चिट्टमवार, धीरज देशमुख आदी उपस्थित होते.
‘एनएसएस’ करणार स्वच्छता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक पुढील हेरिटेज वॉकपासून ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छता मोहीम राबविणार असल्याची माहिती विद्यापीठाचे संचालक डॉ. टी. आर. पाटील यांनी यावेळी दिली, तर शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी रविवारच्या हेरिटेज वॉकमध्ये सहभाग नोंदवला.