सुवर्णमहोत्सवी सप्ताहानिमित्त भाविकांची गर्दी
By Admin | Updated: December 24, 2016 01:02 IST2016-12-24T01:01:16+5:302016-12-24T01:02:38+5:30
बदनापूर : तालुक्यातील वाकुळणी येथील संत वांडमय सेवा संघाचा सुवर्ण महोत्सव सुरू आहे

सुवर्णमहोत्सवी सप्ताहानिमित्त भाविकांची गर्दी
बदनापूर : तालुक्यातील वाकुळणी येथील संत वांडमय सेवा संघाचा सुवर्ण महोत्सव सुरू आहे. या सप्ताहासाठी तालुक्यासोबतच जिल्ह्यातून हजारो भाविक दररोज हजेरी लावत आहे.
या सेवा संघाची स्थापना करणारे वैकुंठवासी गुरूवर्य ह़भ़प़ भानुदासबाबा अटाळकर यांची जन्मभूमी अमरावती जिल्ह्यातील जहागीर, शिक्षण आळंदीत व कर्मभूमी वाकुळणी आहे. ५० वर्षांपूर्वी व्यसनाधीन तरूण वर्गावर चांगले संस्कार करून त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी बाबांनी हा सेवा संघ १९६७ साली सुरू केला. आजपर्यंत शेकडो युवकांना बुवाबाजी कर्मकांडापासून दूर ठेवून मानवी जीवनाचे खरे धडे दिले. या सेवा संघाला ५० वर्षे पूर्ण झाली असून, बाबांनी सुरू केलेले हे काम आजही या संघाकडून नि:स्वार्थीपणे सुरू आहे. बाबानंतर सन १९९७ पासून या सेवा संघाची धुरा ह़भ़प़पंढरीनाथ तावरे नाना महाराज समर्थपणे पुढे नेत आहेत. त्यांनी ग्रामीण भागात कीर्तन, प्रवचनांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, महिला शिक्षण, सबलीकरण, हुंडाबंदी, बेटीबचाव, स्वच्छता अभियान अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करून समाजजागृतीचे काम करीत आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी त्यांनी या परिसरात आपल्या कीर्तनातून त्यांना विशेष मार्गदर्शन करून समाजजागृतीचे काम केले. त्यांनी माणसे जोडली व संबंध दृढ केले या सेवा संघाच्या इमारतीला व मंदिराला स्वत:ची जागा नव्हती. गावातील बाबासाहेब किसनराव अवघड व अंकुश किसनराव अवघड यांनी आपली जागा मोफत दिली. अशा प्रकारे वाकुळणी व परिसरातील ग्रामस्थांचेही सहकार्य या सेवा संघाला वेळोवेळी मिळाले या संघाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘न भूतो’ असा मोठा हरीनाम सप्ताह सुरू आहे. यामुळे प्रथमच नामवंत वक्ते, कीर्तनकार, प्रवचनकार शेती पाणी व अन्य अनेक विषयांवर मार्गदर्शन करीत आहेत.