उमेदवारांची गर्दी
By Admin | Updated: June 8, 2014 00:54 IST2014-06-08T00:46:16+5:302014-06-08T00:54:02+5:30
परभणी : जिल्हा पोलिस दलातील १४४ पदांसाठी भरती प्रक्रियेला ६ जूनपासून प्रारंभ झाला आहे़ कागदपत्र तपासणीसाठी येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर उमेदवारांनी गर्दी केली आहे़

उमेदवारांची गर्दी
परभणी : जिल्हा पोलिस दलातील १४४ पदांसाठी भरती प्रक्रियेला ६ जूनपासून प्रारंभ झाला आहे़ कागदपत्र तपासणीसाठी येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर उमेदवारांनी गर्दी केली आहे़ जिल्हा पोलिस दलात भरती होण्यासाठी ही प्रक्रिया सुरू झाली आहे़ या प्रक्रियेच्या माध्यमातून १४४ जागा भरल्या जाणार आहेत़ पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ६ जूनपासून कागदपत्रे तपासणीला सुरुवात झाली आहे़ दररोज एक हजार उमेदवारांची कागदपत्र तपासणी केली जाणार आहे़ ६ आणि ७ जून असे दोन दिवस २ हजार उमेदवारांची तपासणी पूर्ण झाली़ कागदपत्र तपासणीबरोबरच छाती मोजण्यात येत आहे़ १२ जूनपर्यंत कागदपत्रांची तपासणी पूर्ण होणार असून, त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे़ जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच ही भरती होत आहे़ भरती प्रक्रिया पारदर्शक पार पाडली जाणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले़ दरम्यान, उमेदवारांनी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले़ भरतीविषयी काही तक्रारी असल्यास उमेदवारांनी त्या पोलिस प्रशासनाकडे नोंदवाव्यात, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़ शनिवारी सकाळपासूनच जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर उमेदवारांची गर्दी होत आहे़ जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उमेदवार परभणीमध्ये येत आहेत़ उमेदवारांना पोलिस प्रशासनाच्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र मिळणार आहेत़ या प्रवेशपत्रावर कागदपत्र तपासणीचा दिनांक आणि वेळ नमूद केलेला आहे़ त्यानुसार उमेदवारांनी तपासणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे़ सर्व उमेदवारांनी २५ मे पूर्वीचे शैक्षणिक कागदपत्र आणणे आवश्यक आहे. उमेदवारांनी शाळेचा दाखला, सनद, मागासवर्गीय असल्यास जातीचे मूळ कागदपत्र, २०१३-१४ चे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास सैनिक सेवेचे डिस्चार्ज कार्ड, खेळाडू असल्यास खेळाचे प्रमाणपत्र सोबत आणावेत, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)प्रक्रियेत २० अधिकारी भरती प्रक्रियेसाठी सध्या २० अधिकारी व्यस्त आहेत़ पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक (शहर), चार पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि बारा प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक भरती प्रक्रियेत सहभागी आहेत़ त्यांना मिळणार संधी १२ जूनपर्यंत कागदपत्रांची तपासणी होणार आहे़ ज्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी होणे बाकी असेल अशा पुरुष उमेदवारांची ११ जून रोजी तर महिला उमेदवारांची १२ जून रोजी कागदपत्रे तपासणी होणार आहे़ त्यामुळे उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी ही संधी मिळेल़