दीड कोटीची करवसुली!
By Admin | Updated: November 12, 2016 00:32 IST2016-11-12T00:32:43+5:302016-11-12T00:32:26+5:30
लातूर : मालमत्ता, पाणीपट्टी, एलबीटी आणि दुकान भाड्यापोटी मनपाची ४०० कोटींच्या आसपास थकबाकी आहे.

दीड कोटीची करवसुली!
लातूर : मालमत्ता, पाणीपट्टी, एलबीटी आणि दुकान भाड्यापोटी मनपाची ४०० कोटींच्या आसपास थकबाकी आहे. वसुली मोहीम राबवूनही प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर गुरुवारी मनपाने या नोटा स्वीकारून कर भरणा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील नागरिकांनी शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत १ कोटी ६७ लाखांचा कर भरणा केला.
लातूर शहरात ७० हजार मालमत्ताधारक आहेत. या मालमत्ता धारकांकडे दीडशे कोटींची थकबाकी आहे. तर मनपाच्या गाळेधारकांकडे दीडशे कोटींचे भाडे थकले आहे. एलबीटी आणि पाणीपट्टीची १०० कोटींची थकबाकी आहे. अशी एकूण ४०० कोटींची थकबाकी लातूर शहरातील नागरिकांकडे आहे. या थकबाकी संदर्भात मनपाने यापूर्वी मोहीम राबविली होती. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. गुरुवारी रात्री उशिरा राज्य शासनाकडून कर वसुलीसाठी जुन्या नोटा स्वीकारण्यास शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देत असल्याचे आदेश आले. या संधीचा चांगला फायदा लातूर मनपाने घेतला. आयुक्त रमेश पवार यांनी लातूर शहरातील जनतेला ‘हजार-पाचशेच्या नोटा स्वीकारल्या जातील, कर भरणा करा,’ असे आवाहन केले. शिवाय, कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी शहरातून कर भरण्यासाठी जनजागरण रॅली काढली. भोंग्याद्वारे कर भरण्यासाठी दवंडी दिली. दरम्यान, बँकांमध्ये पैसे भरण्यास विलंब लागत असल्याने नागरिकांनी कर भरणा पसंत केला. रात्री ८ वाजेपर्यंत १ कोटी ६७ लाखांचा भरणा झाला. (प्रतिनिधी)