माळेगाव यात्रेसाठी कोटीचा निधी वर्ग
By Admin | Updated: December 11, 2014 00:28 IST2014-12-11T00:26:24+5:302014-12-11T00:28:01+5:30
नांदेड : दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेसाठी १ कोटी रूपयांच्या निधीचे नियोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले असून यासाठी संबंधित विभागांना निधी वर्गही केला जात आहे़

माळेगाव यात्रेसाठी कोटीचा निधी वर्ग
नांदेड : दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेसाठी १ कोटी रूपयांच्या निधीचे नियोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले असून यासाठी संबंधित विभागांना निधी वर्गही केला जात आहे़ त्याचवेळी पहिल्यांदाच माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शनात लालकंधारीसाठी तब्बल एक लाखांचे बक्षीस दिले जाणार असल्याचा निर्णय बुधवारी झालेल्या पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला़
जिल्हा परिषदेत माळेगाव यात्रेच्या तयारीच्या अनुषंगाने बैठकीचे सत्र सुरू आहे़ तसेच जि़प़ पदाधिकाऱ्यांनी माळेगाव येथेही भेट देवून यात्रास्थळाची पाहणी केली़ कंधार-लोहा मतदारसंघाचे आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत माळेगावमध्ये झालेल्या बैठकीस जि़ प़ अध्यक्षा व उपाध्यक्षांची अनुपस्थिती हाही सध्या चर्चेचा विषय आहे़ माळेगाव यात्रा १० दिवसांवर येवून ठेपली असताना यात्रेवरून राजकीय कलगीतुराही रंगत आहे़ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या यात्रेतील कार्यक्रमांकडेही जनतेचे लक्ष राहणार आहे़
मंगळवारी जिल्हा परिषदेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक घेवून निधीबाबतच्या विनीयोजनाबाबत चर्चा करण्यात आली़ त्यात माळेगाव यात्रेत फिरते शौचालय उपलब्ध करून देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला़ माळेगाव यात्रेसाठी जिल्हा नियोजन समितीकडून जि़प़ पशुसंवर्धन विभागाला २० लाख रूपये उपलब्ध करून दिले जातात़ यंदा कलामहोत्सव व कुस्तीसाठी १२ लाख रूपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत़ यात लावणी महोत्सवाचा खर्च हा ६ लाख रूपये इतका राहणार आहे़ यात्रेच्या नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापनाही करण्यात आली आहे़ हा निधी संबंधित विभागांना वर्ग केला जात आहे़ जिल्हा परिषदेने यंदा जवळपास ७५ लाख रूपये माळेगाव यात्रेसाठी तरतूद केली असल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु़ ए़ कोमवाड यांनी सांगितले़
कृषी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीस रामकिशन येंगलोड, व्यंकट पांडवे, सुनीता हराळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आठवले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी एम़यु़ गोहत्रे, आदींची उपस्थिती होती़ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी माळेगाव यात्रेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे़ हिरव्या चाऱ्याची निर्मिती करण्यासाठी जलशेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक तयार करण्याबाबत सूचना दिल्या आहेत़
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भाविकांचे आरोग्य राखण्यासाठी आरोग्य विभागानेही तयारी पूर्ण केली आहे़ यासाठी ७ अधिकाऱ्यांसह ६१ वैद्यकीय अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत़ यामध्ये ११ वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे़ माळेगाव येथे आयुर्वेद रूग्णालय असून येथील इमारत सुस्थितीत आहे़ या ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील़ आवश्यक तो औषधीसाठा, रूग्णवाहिका, साहित्य उपलब्ध असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बी़एम़ शिंदे व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ़ दुर्गादास रोडे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)