गावासाठी तोडले पिकाचे पाणी
By Admin | Updated: August 17, 2015 00:11 IST2015-08-17T00:11:54+5:302015-08-17T00:11:54+5:30
एऩजी़ बोखारे - आलेगाव- पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी पूर्णा तालुक्यातील आलेगाव सवराते येथे नदी, नाल्यांना पाणीच आले नाही़

गावासाठी तोडले पिकाचे पाणी
एऩजी़ बोखारे - आलेगाव- पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी पूर्णा तालुक्यातील आलेगाव सवराते येथे नदी, नाल्यांना पाणीच आले नाही़ त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ त्यामुळे गावातील एका शेतकऱ्याने शेतातील दोन बोअर व विहिरीचे पाणी तोडून एक वर्षापासून गावाला पाणीपुरवठा सुरू केला आहे़ हा आदर्श इतर गावांनी आदर्श घेण्यासारखा आहे़
आलेगाव सवराते गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी कुठलीही योजना राबविण्यात आली नाही़ त्यामुळे ग्रामस्थांना खाजगी विहीर अथवा हातपंपावरच पाण्याची तहान भागवावी लागते़ दोन वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळे गावातील हातपंप आटले आहेत़ त्यामुळे ग्रामस्थांना एक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़
यातच यंदा पावसाळ्यातील अडीच महिने उलटूनही पाऊस पडलाच नाही़ त्यामुळे गावातील विहिरी व हातपंप पाण्याविना कोरडेठाक पडले आहेत़ भर पावसाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ शेतकरी हरिहरराव सवराते यांनी आपल्या बागायती पिकांची काळजी न करता गावाला पाणीपुरवठा सुरू केला आहे़ एक वर्षापासून गावाला पाणीपुरवठा केला जात आहे़ त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे़ परंतु, या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे़ एवढे करूनही शासन, प्रशासन मात्र उदासीन वृत्ती ठेऊन आहे़