पाणी वापरात हवी काटकसर
By Admin | Updated: October 1, 2016 01:13 IST2016-10-01T00:58:44+5:302016-10-01T01:13:29+5:30
उस्मानाबाद : मागील तीन-चार वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीनंतर यंदा परतीच्या पावसाने जिल्हावासियांना काहीसा दिलासा दिला आहे़ असे असले

पाणी वापरात हवी काटकसर
उस्मानाबाद : मागील तीन-चार वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीनंतर यंदा परतीच्या पावसाने जिल्हावासियांना काहीसा दिलासा दिला आहे़ असे असले तरी जिल्ह्यात जवळपास ६० टक्केच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़ या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे मत ५८ टक्के नागरिकांनी व्यक्त केले़ तर घरातील, सार्वजनिक नळांना तोट्या बसविणे गरजेचे असल्याचेही ३८ टक्के नागरिकांनी सांगितले़
उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी मागील तीन-चार वर्षे भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना केला आहे़ यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबरच्या प्रारंभीपर्यंत पावसाने नेहमीप्रमाणे हुलकावणी दिली होती़ मात्र, परतीच्या पावसाने जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील १०० हून अधिक प्रकल्प तुडूंब भरले असून, अनेक साठवण तलावातील पाणीसाठा वाढला आहे़ तर विहिरी, कुपनलिकांची पाणीपातळीही वाढली आहे़ सततचा दुष्काळ पाहता पाणी वापराबाबत ‘लोकमत’ने सर्वसामान्यांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले़ यात ‘दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याचा वापर कसा करावा?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता़ यावर ५८ टक्के नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे असल्याचे मत नोंदविले़ तर २५ टक्के नागरिकांनी पाण्याचा गरजेनुसार मुबलक वापर व्हावा, असे सांगितले़ तर १८ टक्के नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे मत नोंदविले़ पाणी बचतीसाठी काय करता ? या प्रश्नावर ३८ टक्के नागरिकांनी नळाला तोट्या बसवाव्यात असे तर ३० टक्के नागरिकांनी पाण्याच्या नळाला लागलेली गळती रोखावी, असे सांगितले़ तर ३२ टक्के नागरिकांनी इतर उपाय करावेत, असे मत नोंदविले़ (प्रतिनिधी)