पावसाच्या उघडिपीमुळे पिके सलाईनवर
By Admin | Updated: September 30, 2014 01:24 IST2014-09-30T00:43:40+5:302014-09-30T01:24:49+5:30
नांदेड : यंदा मृग नक्षत्र सुरु होऊन जवळपास अडीच महिन्यानंतर पावसाने हजेरी लावूनही ३१ आॅगस्टपर्यंत ७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणी झाली.

पावसाच्या उघडिपीमुळे पिके सलाईनवर
नांदेड : यंदा मृग नक्षत्र सुरु होऊन जवळपास अडीच महिन्यानंतर पावसाने हजेरी लावूनही ३१ आॅगस्टपर्यंत ७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणी झाली. मागच्या आठवड्यापर्यंत पिके समाधानकारक वाटत होती, परंतुु पावसाने उघडीप दिल्याने तोऱ्यात डोलत असलेली पिकेही आता सलाईनवर आहेत.
आजपर्यंत केवळ ४४ टक्के पाऊस झाला असून अजूनही ५६ टक्के पाऊस बरसला नाही़ आतापर्यंत ४१८़३८ मि़ मी़ पाऊस झाला आहे़ जिल्ह्यात १ जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत ९५५़ ५५ मि़ मी़ पाऊस पडतो़ कोरड्या दुष्काळाचे सावट असताना आॅगस्ट महिन्याच्या शेवटी पावसाचे आगमन झाल्याने जिल्ह्यात ४४़०६ टक्के पाऊस झाला़ ३० आॅगस्टपासून सुरू झालेले पूर्वा नक्षत्र १२ सप्टेंबर रोजी संपले़ त्यानंतर सुरू झालेल्या उत्तरा नक्षत्रात विशेष पाऊस झाला नाही़ २७ सप्टेंबरपासून हस्त नक्षत्र सुरू झाले असून हे नक्षत्र ९ आॅक्टोबर पर्यंत हे नक्षत्र राहणार आहे़ त्यानंतर चित्रा हे नक्षत्र सुरू होईल़ ३१ आॅक्टोबरपर्यंत पाऊस सोबतीला आहे़ मागील वर्षी १ जून ते १८ सप्टेंबर या कालावधीत ९३८़१५ मि़मी़ पाऊस झाला होता़ तरयंदा मात्र ४१८़३८ मि़ मी़ पावसावरच समाधान मानावे लागत आहे़
गत पंधरा दिवसांपासून पाऊसच नसल्याने खरीप हंगामत शेतकऱ्यांच्या हातचा जातो की, काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात गतवर्षी ३१ जुलैपर्यंत ७ लाख ४१७०० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती, तर यंदा ३१ आॅगस्टपर्यंत यावर्षी उशिरा झालेल्या पावासामुळे काही भागातील पेरण्या होऊ शकल्या नसल्याने अंदाजे ४० हजार एकर क्षेत्र पेरणीअभावी शिल्लक राहिले आहे. पेरणी झालेली पीके गेल्या महिन्यात पडलेल्या पावसाने बरी होती परंतु पंधरा दिवसापासून उघडीप असल्याने सोयाबीनसह कापसाची पीके उन्हाने सुकत आहेत.
ज्या भागात सिंचनाची व्यवस्था आहे तेथील शेतकरी कृषीपंपाद्वारे, ठिबक सिचंनाद्वारे पाणी देत असले तरी कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना मात्र पावसाची चिंता लागली आहे. पाऊस पडेल की नाही या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.
यापूर्वी अधूनमधून बरसणाऱ्या पावसावरच बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र पावसाने दडी मारल्याने त्यांच्यावर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले. तर काही शेतकऱ्यांनी धाडस करुन पेरण्या केल्या. जिल्ह्यात ३१ आॅगस्टपर्यंत ९३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
पाऊस पडला असला तरी पेरणीचा हंगाम संपल्यामुळे पेरणी करुनही पीक हातात पडेल की, नाही याची शाश्वती नाही, यामुळे उर्वरित असलेल्या क्षेत्रावर पेरणी होणे शक्य नाही. यातील जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी केलेली आहे.
गतवर्षी सप्टेंबर महिन्यात पिके मोठी होऊन डोलू लागली होती. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागल्याने दुबार-तिबार पेरणी करुनही पिके समाधानकारक नाहीत.
शिवाय पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत पाऊस पडला तरी खरिपाच्या काही भागातील पिके तारतील अन्यथा खत-बी-बियाणासाठी टाकलेला खर्चही वाया जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)