खरीप हंगामासाठी पीक विमा योजना
By Admin | Updated: July 26, 2014 00:36 IST2014-07-25T23:39:43+5:302014-07-26T00:36:00+5:30
पालम : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळावे यासाठी खरीप हंगामासाठी पीक विमा योजना शासनाने लागू केली आहे.

खरीप हंगामासाठी पीक विमा योजना
पालम : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळावे यासाठी खरीप हंगामासाठी पीक विमा योजना शासनाने लागू केली आहे. या योजनेंतर्गत १३ पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुरेंद्र पवार यांनी केले आहे.
राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत चालू खरीप हंगाम २०१४ या वर्षासाठी ही विमा योजना आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, पावसात खंड पडणे, रोगराई व किडीचा प्रादूर्भाव यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होत असते. पिकांच्या नुकसानीत क्षेत्र घटक धरून विमा संरक्षण प्राप्त झाले आहे. ही विमा योजना मूग, उडीद, सोयाबीन, खरीप ज्वारी, भात, बाजरी, कापूस, तूर, ऊस, तीळ या पिकांना लागू करण्यात आलेली आहे. सर्वसाधारण विम्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना विमा हप्तामध्ये १० टक्के सवलत मिळणार आहे. शेतकऱ्यांनी ८ अ चा उतारा, सातबारा, पीक पेरा प्रमाणपत्र व बँकेचे पैसे भरण्याचा फॉर्म असा प्रस्ताव तयार करून विमा उतरवावा लागणार आहे. यासाठी बँकेमध्ये कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याची शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)
३१ जुलै विम्याची शेवटची तारीख
विमा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१४ आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने विमा हप्ता भरून पीक विमा संरक्षण मिळवावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुरेंद्र पवार, मंडळ कृषी अधिकारी अंबुलगेकर, जाधव, कृषी पर्यवेक्षक, संभाजी वाघमोडे, प्रवीण काळे, दत्ता दुधाटे, बालाजी चव्हाण आदींनी केले आहे.