चलन तुटवड्यामुळे पीक विमा अधांतरी
By Admin | Updated: May 8, 2017 23:29 IST2017-05-08T23:29:04+5:302017-05-08T23:29:52+5:30
बीड : जिल्ह्यात निर्माण झालेल्या चलन तुटवड्यामुळे ऐन लग्नसराईत शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी मंजूर झालेले पैसे मिळणे मुश्किल बनले आहेत

चलन तुटवड्यामुळे पीक विमा अधांतरी
संजय तिपाले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात निर्माण झालेल्या चलन तुटवड्यामुळे ऐन लग्नसराईत शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी मंजूर झालेले पैसे मिळणे मुश्किल बनले आहेत. सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांचे वाटप रखडले आहेत. परिणामी जिल्हा बँकेचे व्यवहार ठप्प असून, मागणी व पुरवठ्यातील तफावतीमुळे अधिकारी हवालदिल झाले आहेत.
२०१५ मधील कापूस अनुदानापोटी जिल्ह्याला २३८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. रबी २०१५ वर्षातील पीक विम्याचे २१६ कोटी व २०१६ मधील खरीप पीक विम्याचे ९८ कोटी आले आहेत. शासनाकडून मंजूर झालेल्या पीक विमा रकमेचे जिल्हा बँकेकडून वाटप होते. जिल्हा बँकेच्या एकूण ५९ शाखा आहेत. त्यापैकी २ शाखांचे कार्यक्षेत्र शहरी आहे. त्यामुळे ५७ शाखांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामच उरले नाही. जिल्हा बँकेने अग्रणी बँकेकडे मागणी करूनही आवश्यक त्या रकमेचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे विमा रकमेचे वाटप रखडले आहे.
ऐन लग्नसराईत पीक विमा रक्कम मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, पैसे पदरात पडण्यासाठी त्यांना जिल्हा बँकेत खेटे मारावे लागत आहेत. बँक अधिकाऱ्यांकडून पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर वादही होत आहेत. लग्नसराई, बांधकाम व शेतीकामासाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे. मात्र, अशा अडचणीच्या वेळीच बँकेत खडखडाट आहे. उसनवारीसाठीही अनेकानी हात आखडता घेतल्यामुळे अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांसमोरील संकटांची मालिका काही थांबत नसल्याचे दिसून येत आहे.