८५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By Admin | Updated: March 17, 2017 00:25 IST2017-03-17T00:25:14+5:302017-03-17T00:25:59+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा, लातूर, निलंगा, उदगीर, देवणी, रेणापूर तालुक्यांतील अनेक गावांत बुधवारी झालेल्या गारपिटीमुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

८५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा, लातूर, निलंगा, उदगीर, देवणी, रेणापूर तालुक्यांतील अनेक गावांत बुधवारी झालेल्या गारपिटीमुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासनाला दिले आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांची गावस्तरावर समिती गठित करण्यात आली असून, या समितीमार्फत पंचनाम्याला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात एकूण ८५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
लातूर तालुक्यातील हजारो हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान गारपिटीमुळे झाले असून, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार संजय वारकड तसेच तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व गावातील शेतकऱ्यांनी ढोकी-येळी, चिंचोली बल्लाळनाथ, पिंपरी आंबा आदी गावांतील शिवारामध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली.
तसेच औसा तालुक्यात औसा, रेणापूरचे उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार अहिल्या गाठाळ यांनी पाहणी केली असून, औसा तालुक्यात जवळपास २५ द्राक्षबागा असून, या बागा गारपिटीने अक्षरश: आडव्या झाल्या आहेत. द्राक्ष पिकांची मोठी हानी गारपिटीमुळे झाली असून, त्याची पाहणी या अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी केली. तीन वर्षांपूर्वी झालेल्या गारपिटीने लातूर जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीची आठवण कालच्या वादळ-वाऱ्याने करून दिली असून, या वादळात आंब्याची झाडे, द्राक्ष बागा, फळबागा नष्ट झाल्या आहेत. तसेच गहू, हरभरा, ज्वारी या पिकांवरही अक्षरश: पाणी पडले आहे. त्याचा पंचनामा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांची समिती गठित केली असून, या समितीमार्फत गावातील प्रत्येक शेतातील पिकांचा पंचनामा केला जाणार आहे. येत्या आठ दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या समित्यांना दिले आहेत. शेत, गाव आणि पीकनिहाय याद्या तयार करून पंचनामे केले जाणार आहेत. त्यानंतर अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे. (प्रतिनिधी)