‘एसटी’ महामंडळाच्या कार्यशाळेवरही संकट

By Admin | Updated: October 20, 2016 01:47 IST2016-10-20T01:22:02+5:302016-10-20T01:47:16+5:30

औरंगाबाद : एस. टी. महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय बंद करण्याच्या हालचाली सुरू असताना चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेवरही संकट ओढावले आहे.

Crisis on 'ST' Corporation Workshop | ‘एसटी’ महामंडळाच्या कार्यशाळेवरही संकट

‘एसटी’ महामंडळाच्या कार्यशाळेवरही संकट


औरंगाबाद : एस. टी. महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय बंद करण्याच्या हालचाली सुरू असताना चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेवरही संकट ओढावले आहे. खाजगीतून बसगाड्यांची बांधणी करून घेण्यात येत असल्याने कार्यशाळेला चेसीसचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. मार्चपर्यंत चेसीसचा पुरवठा थांबवल्याने एकट्या चिकलठाणा कार्यशाळेत तब्बल २७० नव्या बसगाड्या बांधणीला बे्रक लागला.
एस. टी. महामंडळ डीलक्स वर्गातील बसगाड्यांची खाजगीतून बांधणी करून घेत आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महामंडळाच्या दापोली, नागपूर आणि औरंगाबादेतील चिकलठाणा कार्यशाळेत बसगाड्यांची बांधणी केली जाते. महामंडळाच्या स्वत:च्या कार्यशाळा असताना खाजगीतून बसगाड्या बांधून घेण्यावर भर दिला जात आहे. त्यातून कार्यशाळेचे अस्तित्व धोक्यात आणले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कार्यशाळेतील चेसीसचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. आगामी मार्च महिन्यापर्यंत चेसीसचा पुरवठा केला जाणार नसल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली.
चिकलठाणा कार्यशाळेत महिन्याला सरासरी ५४ नव्या बसगाड्यांची बांधणी केली जाते. कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे या संख्येतही वाढ होते.
४आगामी पाच महिने चेसीसचा पुरवठा होणार नसल्याने किमान २७० नव्या बसेस रस्त्यावर उतरणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांनाही अनेक मार्गांवर जुन्या ‘एसटी’तूनच प्रवास करावा लागेल.
बाहेरून बसेस बांधून घ्यायच्या आणि चेसीसचा पुरवठा बंद करायचा, यातून कार्यशाळा बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुनर्बांधणी करण्यासाठी बसेस नाहीत. त्यामुळे कार्यशाळेत काहीही काम राहणार नाही.
-डी. ए. लिपणे पाटील, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)
बांधणी बंद नको
बाहेरून बसगाड्यांची बांधणी केली जात आहे. तरीही कार्यशाळेतील नव्या बसगाड्यांची बांधणी बंद होऊ नये. कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्याचा प्रश्न निकाली काढला पाहिजे. कार्यशाळा बंद करण्यास विरोध केला जाईल.
- हनुमंत ताटे, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

Web Title: Crisis on 'ST' Corporation Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.