औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अजूनही विमान मालवाहतूक, जहाजांद्वारे होणारी मालवाहतूक ठप्प आहे. त्यामुळे विविध देशांत कंटेनर अडकून पडले आहेत. तथापि, प्लास्टीक उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवर मोठा परिणाम झाला असून दुसरीकडे, कच्च्या मालाच्या सीमाशुल्कामध्येही कैक पटीने वाढ झाल्यामुळे औरंगाबादसह देशभरातील प्लास्टीक उद्योग संकटात सापडले आहेत.
औरंगाबादेत गरवारे पॉलिएस्टर, कॉस्मो फिल्म या मोठ्या कंपन्यांसह लहान-मोठे मिळून जवळपास सव्वाशे उद्योग कार्यरत आहेत. हे उद्योग शेतीसाठी पीव्हीसी पाईप, ठिबक सिंचनाचे पाईप, पॉलिहाऊससाठी लागणारे प्लास्टीकचे आच्छादन, ऑटोमोबाईलसाठी लागणाऱ्या वस्तू, पाण्याच्या बाटल्या, दुधाच्या पिशव्या, कार किंवा अन्य इंटेरियर डिझाईनसाठी काचांना लावण्यात येणारी फिल्म, एक्स रेसाठी प्लास्टीकची सीट आदी दैनंदिन गरजांची उत्पादने तयार करतात.
टंचाईची कारणे नेमके कोणती
मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अनेक देशांत लॉकडाऊन करण्यात आले. विमान मालवाहतूक व जहाज वाहतूक ठप्प झाली. मात्र, सप्टेंबरपासून चीन यातून सावरला व त्याने आपल्या देशातील उद्योग व निर्यातील गती दिली. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर चीनने सुमारे ९ लाख कंटेनरद्वारे उत्तर अमेरिकेसह अनेक देशांत उत्पादने व कच्चा माल निर्यात केला. मात्र, ते कंटेनर हाताळण्यासाठी किंवा परत चीनला पाठविण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे अनेक देशांत कंटेनर पडून आहेत. परिणामी, चीनसह विविध देशांतून भारतात येणाऱ्या कच्च्या मालावर मर्यादा आली. सध्या त्याची सर्वाधिक झळ प्लास्टीक उद्योगांना बसली आहे.
दुपटीने वाढल्या कच्च्या मालाच्या किमती
यासंदर्भात मराठवाडा प्लास्टीक मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष भरतसिंग राजपूत यांनी सांगितले की, अलीकडच्या पाच महिन्यांपासून वेगवेगळ्या प्लास्टीक उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती व सीमाशुल्कात भरमसाठ वाढ झाल्यामुळे औरंगाबादसह देशभरातील प्लास्टीक उद्योग अडचणीत सापडले आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत शंभर पटीने वाढ झाली आहे. याबाबत आमच्या देशपातळीवरील संघटनेने कच्च्या मालाच्या भाववाढीवर नियंत्रण आणण्याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा केली आहे. त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रातील अनेक प्लास्टीक उद्योग कधी बंद पडतील, ते सांगता येत नाही.
कोठून येतो कच्चा माल
भारतात प्रामुख्याने सौदी अरब, जपान, कोरिया, थायलंड या देशांतून प्लास्टीक उत्पादनासाठी कच्चा माल (दाणे स्वरुपात) येतो. देशात ओएनजीसी, इंडियन ऑईल, एमआरपीएल, एचएमईएल या सरकारी कंपन्याबरोबर रिलायन्स ही खासगी कंपनी कच्चा माल तयार करते. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची टंचाई जाणवत आहे.
भाववाढीची स्थिती अशी
कच्चा माल सध्याची दरवाढ टक्केवारीमध्ये
पीव्हीसी ६४ टक्के
एबीएस १४० टक्के
पीसी १११ टक्के
एचडीपीई २८ टक्के
पॉलिप्रोपीलीन ३४ टक्के
जीपीएस ४३ टक्के
एचआयपीएस ४८ टक्के