दुर्गंधीने शहरवासीय त्रस्त
By Admin | Updated: May 6, 2017 00:09 IST2017-05-06T00:06:16+5:302017-05-06T00:09:23+5:30
बीड : देशातील ४३४ स्वच्छ शहराच्या यादीत महाराष्ट्रातील ४४ शहरांपैकी बीड हे एक शहर असल्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर केले अन् बीडकरांच्या भुवया उंचावल्या

दुर्गंधीने शहरवासीय त्रस्त
व्यंकटेश वैष्णव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : देशातील ४३४ स्वच्छ शहराच्या यादीत महाराष्ट्रातील ४४ शहरांपैकी बीड हे एक शहर असल्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर केले अन् बीडकरांच्या भुवया उंचावल्या. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. शहरात बोटावर मोजण्याइतकीच सार्वजनिक शौचालये असली तरी त्यांची दुरवस्था झालेली आहे. अशा पार्श्वभूमीवर स्वच्छ सर्वेक्षणात भारतात बीडचा ३०२ क्रमांक आला कसा, हा प्रश्न बीडकरांना पडला आहे.
स्वच्छता सर्वेक्षण-२०१७ मध्ये भारतातून ४३४ शहरांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४४ शहरे आहेत. यात बीडचा ३०२ क्रमांक असल्याचे दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून जाहीर झाले. बीड शहरातील स्वच्छतेची वस्तुस्थिती अत्यंत गंभीर आहे. बीड नगरपालिकेचा कारभार सध्या उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्याकडे आहे. याबाबत त्यांना संपर्क केला असता त्यांनी स्वच्छता सर्वेक्षणमध्ये बीडला मिळालेल्या क्रमांकाबाबत माहिती नसल्याचे सांगितले.
आजघडीला बीड शहरातील स्वच्छतेचा पूर्णत: बोजवारा उडालेला आहे. चक्क टेंडर संपल्यामुळे काही महिन्यांपासून घंटागाड्या बंद आहेत. परिणामी ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याने शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बीड शहरातील भाजी मंडई, बशीरगंज, मोमीनपुरा, सहयोगनगर, कटकटपुरा, स्वराज्यनगर आदी भागांत कचऱ्याची दुर्गंधी पसरली आहे. हद्दवाढ भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. वस्तुस्थिती लक्षात घेतली तर स्वच्छता सर्वेक्षण-२०१७ मध्ये बीडचा क्रमांक कसा आला, याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.