मुखेडमधील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

By Admin | Updated: June 29, 2017 00:28 IST2017-06-29T00:26:24+5:302017-06-29T00:28:39+5:30

मुखेड : मुखेड तालुक्यातील सर्वच भागात गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले.

Criminal crisis on the farmers of Mukhed | मुखेडमधील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

मुखेडमधील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
मुखेड : मुखेड तालुक्यातील सर्वच भागात गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले. दुबार पेरणी करावी लागते की काय? या चिंतेत शेतकरी असून सध्या ढगाळ वातावरण झाल्यामुळे पेरणी थांबवलेले शेतकरी पुन्हा आभाळाकडे बघतच पेरणीच्या कामी लागले आहेत़
पाऊस पडणार या अपेक्षेने तालुक्यातील ६० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली तर ४० टक्के शेतकऱ्यांनी पावसाअभावी पेरणी थांबविली. मंगळवारपासून ढगाळ वातावरण झाल्याने आता पेरणी थांबवलेले शेतकरी पुन्हा पेरणीच्या कामात गुंतले असून शेतकरी अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़
तालुक्यात ९५ हजार २३९ हेक्टर एवढे एकूण भौगोलिक क्षेत्र आहे़ पैकी ८२ हजार ५२० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे व ३२३३ हेक्टर क्षेत्र पडीक, वनाखाली ३१०४ हेक्टर, कुरण क्षेत्र ३५१ हेक्टर, गायरान ४२२८ हेक्टर व इतर १८०१ हेक्टर एकूण विभाजित असे भौगोलिक क्षेत्र आहे़ तालुक्याचा जास्तीत जास्त भाग दुर्गम व डोंगराळ असल्यामुळे व पाणी साठवणीचे मोठे तळे, धरणे नसल्या कारणाने तालुक्यात सिंचन क्षेत्र फारच कमी आहे़ तालुक्यात फक्त ४५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे़ गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांना रबी पिके व उन्हाळी पिके घेता आली़
तालुक्यातील मुखेड, जांब बु़, चांडोळा, बाऱ्हाळी, येवती, जाहूर, मुक्रमाबाद या सात गावच्या पर्जन्यमान नोंदीवरून तालुक्यात सरासरी पर्जन्यमान १४३़७१ मि़मी़ पावसाची नोंद झाली. यावरून पावसाचे तालुक्यातील प्रमाण अतिशय नगण्य आहे़, हे लक्षात येते.
शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात महागडी बी-बियाणे खरेदी करून शेतात ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकांची लागवड केली़ दोन आठवड्यापासून पाऊस नाही़ पेरून पिकांची चिंता तर दुसरीकडे पेरणी न झाल्याची चिंता अशा कोंडीत शेतकरी अडकला आहे़ गेल्या ३ वर्षांतील २ वर्षे कोरड्या दुष्काळात तर मागचा एक वर्ष ओला दुष्काळात तर या वर्षी काय होणार? आता येणाऱ्या दोन-चार दिवसांत पाऊस झाला नाही तर पिके करपण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Criminal crisis on the farmers of Mukhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.