पोलीस अधिकार्यांवर गुन्हे
By Admin | Updated: May 31, 2014 00:34 IST2014-05-31T00:20:36+5:302014-05-31T00:34:35+5:30
विशाल सोनटक्के, उस्मानाबाद कनगरा येथे पोलिसांनी ग्रामस्थांवर केलेल्या अमानुष अत्याचाराबद्दल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी जाहीर दिलगिरी व्यक्त केली,

पोलीस अधिकार्यांवर गुन्हे
विशाल सोनटक्के, उस्मानाबाद कनगरा येथे पोलिसांनी ग्रामस्थांवर केलेल्या अमानुष अत्याचाराबद्दल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी जाहीर दिलगिरी व्यक्त केली, तसेच सदर प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळणार्या पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकार्यांविरुद्ध प्रशासकीय कार्यवाहीसोबत गुन्हे दाखल करण्याचे आदेशही गृहमंत्र्यांनी दिले. राज्यातील पोलीस दलाला या कारवाईतून योग्य संदेश जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. एरवी कारवाईचा बडगा कनिष्ठ अधिकार्यांवर उगारला जात असल्याच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर थेट वरिष्ठ अधिकार्यांवरच गुन्हे दाखल करण्याची कृती अनपेक्षित आहे़ ‘लोकमत’ने मागील चार दिवसांपासून या घटनेचा पाठपुरावा केला होता. गृहमंत्री पाटील यांनी शुक्रवारी पाचव्या दिवशी कनगर्यास भेट दिली. माजी खा. डॉ. पद्मसिंह पाटील, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक एस. जगन्नाथ, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यावेळी उपस्थित होते. येथील महिलांनी दारुबंदीची मागणी केली होती. अवैध दारूविक्रेत्यावर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी मध्यरात्री गावात जाऊन दिसेल त्याला झोडपून काढले. या मारहाणीत ५० पेक्षा अधिक ग्रामस्थ जखमी झाले आहेत. याप्रकारामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत होता. कनगरा येथे घडलेला प्रकार शासनाच्या सहनशिलतेपलीकडचा आहे. त्यामुळे आज कनगर्यात ग्रामस्थांसमोर येताना वेदना होत असल्याचे गृहमंत्री पाटील म्हणाले. प्रथम त्यांनी ग्रामस्थांशी व नंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आपण या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक एस़जगन्नाथ यांना चौकशीचे आदेश दिले. तसेच प्राथमिक चौकशीवरून सहायक पोलीस निरीक्षकासह चौघांना निलंबित केले. हे प्रकरण पोलीस अधीक्षक सचिन पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली कडूकर यांनी चुकीच्या पद्धतीने हाताळले. विशेष पोलीस महानिरीक्षक येत्या दोन दिवसांत ते अहवाल सादर करतील. यात काय कारवाई करणे आवश्यक आहे, तेही त्यांनी अहवालातील शिफारशीत नमूद करावे, अशी सूचनाही गृहमंत्र्यांनी यावेळी केली. गृहविभागाकडून औषधोपचार मुख्यमंत्री निधी आणि शिक्षा म्हणून माझ्या गृहविभागाकडील निधीतून कनगर्यातील पीडितांच्या औषधोपचाराचा खर्च करण्यात येईल, असे गृहमंत्री पाटील यांनी सांगितले. जखमींवर चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करण्यात येतील, असे सांगतानाच घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पाटील यांनी महसूल विभागाला दिले. काय होते प्रकरण कनगरा येथील महिलांनी दारूबंदीची मागणी केली होती. अवैध दारूविक्रेत्यावर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी मध्यरात्री गावात जाऊन दिसेल त्याला झोडपून काढले. या मारहाणीत ५० पेक्षा अधिक ग्रामस्थ जखमी झाले आहेत.