मोह्यातील बोगस डॉक्टरवर गुन्हा
By Admin | Updated: February 1, 2015 00:57 IST2015-02-01T00:55:05+5:302015-02-01T00:57:17+5:30
कळंब : वैद्यकीय व्यवसायासाठी नोंदणी नसताना व वैद्यकीय पदवी धारण केलेली नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरवर कळंब पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

मोह्यातील बोगस डॉक्टरवर गुन्हा
कळंब : वैद्यकीय व्यवसायासाठी नोंदणी नसताना व वैद्यकीय पदवी धारण केलेली नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरवर कळंब पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ बोगस डॉक्टर मोहा येथील असून, त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले़
जिल्ह्यात बोगसरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला दिले होते़ त्यानुसार कळंबचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ पुरूषोत्तम पाटील व त्यांच्या पथकाने शनिवारी मोहा येथे भेट दिली़ त्यावेळी अंचिता निरापोंडराय हे वैद्यकीय पदवी नसतानाही वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे दिसून आले़ त्यानंतर अंचिता यांच्या क्लिनिकमध्ये विष्णू महादेव भांगे या इसमास रूग्ण म्हणून पाठविण्यात आले होते़ भांगे यांची तपासणी करून त्यांना अंचिता यांनी अॅलोपॅथी औषधी व मेडिकल प्रिस्क्रिप्शन दिले़ त्यावेळी पथकाने अचानक रूग्णालयात जावून अंचिता यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र व पदवी मागितली असता ती दाखविण्यात आली नाही़ त्यानंतर पथकाने व्यवसायासाठी असलेल्या साहित्याचा पंचनामा केला़ याबाबत वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी नोंदणी व अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी यापैकी एकाचीही पदवी किंवा पदविका नसताना बेकायदेशीर रूग्ण तपासणी व औषधोपचार केल्याप्रकरणी अंचित निरापोंडराय यांच्याविरूध्द कळंब पोलीस ठाण्यात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ पुरूषोत्तम पाटील यांनी फिर्याद दिली़ या फिर्यादीवरून अंचिता यांच्याविरूध्द गुरनं १०/१५ भादंवी कलम ४१९, ४२०, ४६८, ४७१ व महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिस्रर्स अॅक्ट १९६१ चे कलम ३३ (२) नुसार गुन्हा दाखल झाला आहे़ अंचिता यांना अटक करण्यात आली असून, तपास आऱबीख़र्डे हे करीत आहेत़ (वार्ताहर)