आरटीओ अधिकाऱ्यांसह वाहन विक्रेत्यांवर गुन्हा
By Admin | Updated: April 30, 2016 00:07 IST2016-04-29T23:42:52+5:302016-04-30T00:07:57+5:30
औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुचाकी-चारचाकी वाहन विक्रेत्यांशी संगनमत करून असंख्य वाहनांची बोगस कागदपत्रे तयार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

आरटीओ अधिकाऱ्यांसह वाहन विक्रेत्यांवर गुन्हा
औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुचाकी-चारचाकी वाहन विक्रेत्यांशी संगनमत करून असंख्य वाहनांची बोगस कागदपत्रे तयार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणात शुक्रवारी सकाळी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडको एन-१२ परिसरातील रहिवासी सुग्रीव नामदेव विटेकर आणि त्यांचा मित्र मोहंमद शफी मोहंमद यासीन मागील काही वर्षांपासून दुचाकी, चारचाकी वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. शफी वाहने खरेदी करतो आणि विटेकर यांच्या ताब्यात आणून देतो. वाहनांची कागदपत्रे शफी याने कधीच दिली नाहीत. वाहन विक्री केल्यावर शफी चेकने विटेकर यांना पैसे देत होता. अलीकडेच देण्या-घेण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. विटेकर यांच्याकडे दोन वाहने होती. या वाहनांची विटेकर यांनी आरटीओ कार्यालयात माहिती घेतली असता ती अगोदर मूळ मालकाच्या नावावर असल्याचे निदर्शनास आले. काही दिवसांनंतर माहिती अधिकारात माहिती घेतली असता वाहन क्र. एमएच-२०-८६०२ आणि वाहन क्र. एमएच-२०-६४१० ही दोन्ही वाहने शफी याने आपल्या नावावर करून घेतली. विटेकर यांनी वाहनांसह मूळ मालकांकडे धाव घेतली. त्यांनी आम्ही शफी नावाच्या व्यक्तीला वाहन विकलेच नसल्याचे सांगितले. विटेकर यांनी आज क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दिली.
आरटीओ कार्यालयातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गुणवंत सी. गवई, विरिष्ठ लिपिक विक्रम राजपूत, कनिष्ठ लिपिक, मोहंमद शफी, शेख सलीम सिद्दीकी यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारावर विटेकर यांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी आरोपींना अटक केली नव्हती.