एमआयएम शहराध्यक्ष नदीमसह सात जणांवर गुन्हा
By Admin | Updated: June 24, 2017 23:54 IST2017-06-24T23:50:57+5:302017-06-24T23:54:23+5:30
औरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद उल मुस्लिमीनचे (एमआयएम) औरंगाबाद पूर्वमधील शहराध्यक्ष शेख मोहंमद नदीम यांनी खोटी कागदपत्रे सादर करून शासनाकडून तब्बल ६ लाख ४० हजार रुपये लाटल्याची माहिती आहे.

एमआयएम शहराध्यक्ष नदीमसह सात जणांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद उल मुस्लिमीनचे (एमआयएम) औरंगाबाद पूर्वमधील शहराध्यक्ष शेख मोहंमद नदीम यांनी बेगमपुऱ्यात एका मशीदमध्ये मदरसा सुरू असल्याची खोटी कागदपत्रे सादर करून शासनाकडून तब्बल ६ लाख ४० हजार रुपये लाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात ४२० चा गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एमआयएममध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शासनाने मदरशामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार सोयी- सुविधा मिळाव्यात हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून डॉ. जाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना सुरू केली. या योजनेत नोंदणीकृत मदरशाला प्रत्येकी दोन लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. एमआयएमचे औरंगाबाद पूर्वमधील शहराध्यक्ष शेख मोहंमद नदीम यांनी बेगमपुऱ्यातील छोटी मशीदमध्ये मदरसा सुरू असल्याचे दाखविले. या आधारावर त्यांनी शासनाकडून ६ लाख ४० हजार रुपये लाटले. नदीम यांनी अनुदान लाटण्यासाठी ‘लोकहित शिक्षण संस्था’ स्थापन केली. या संस्थेत मोहम्मद हम्माद मोहम्मद रफी, शेख मोहम्मद इलियास, शेख फरलिन तबस्सूम खमर पाशा, शेख शफिक यासीन, डॉ. मोहम्मद हादी मोहम्मद रफी, डॉ. इमरान उस्मान आदींची नेमणूक करण्यात आली. डॉ. इमरान उस्मान हे मौलाना आझाद महाविद्यालयात प्राचार्य होते. अलीकडेच त्यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मुनवर अहमद नईम अहमद (रा. पाटणी कॉम्प्लेक्स, कबाडीपुरा) यांनी याविषयी सिटीचौक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली.