प्राचार्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:21 IST2021-02-05T04:21:02+5:302021-02-05T04:21:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रकमेचा अपहार केल्याच्या आरोपावरून निसर्गदीप शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि प्राचार्यासह ८ जणाविरुध्द ...

प्राचार्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रकमेचा अपहार केल्याच्या आरोपावरून निसर्गदीप शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि प्राचार्यासह ८ जणाविरुध्द क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
संस्थेचे पदाधिकारी विजेंद्र गुलाबसिंग जाधव (रा. बंजारा कॉलनी), सुरेश विजेंद्र जाधव (४६), सुरजित आसाराम राठोड (४६, रा. संजय नगर), कमलेशसिंग रघुनाथसिंग ठाकूर (६०), विजय संभाजी संभटवाड (रा. विद्युत कॉलनी), जयसिंग पोपटसिंग सिंघल, विजय पिरण पाटील आणि एका महिलेचा आरोपींमध्ये समावेश आहे.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार मांगीलाल गोवर्धन चव्हाण (६२, रा. नारायण नगर) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, संस्थेचे चितेपिंपळगाव येथे श्री तुळजाभवानी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आहे. या संस्थेमध्ये १ जून २००७ ते २५ जानेवारी २०२१ या कालावधीत हजारो विद्यार्थी शिकत होते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती प्राप्त होते. प्राप्त शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्याची जबाबदारी महाविद्यालय प्रशासन आणि संस्थाचालकांची होती. त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून शिष्यवृत्तीच्या रकमेचा अपहार केल्याचे माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळवलेल्या माहितीत तक्रारदार यांना समजली. यानंतर तक्रारदारांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मात्र, त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली नव्हती. त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्यांच्या अर्जाची दखल घेऊन गुन्हा नोंदविण्याचे आदेश पोलिसांना दिले. २५ जानेवारी रोजी क्रांती चौक पोलिसांनी याविषयी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.