पाच आयोजकांसह १३ नर्तिकांवर गुन्हा
By Admin | Updated: August 13, 2014 01:06 IST2014-08-13T00:39:25+5:302014-08-13T01:06:33+5:30
पाटोदा : तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर यात्रेत नर्तिका नाचविल्या प्रकरणी पाटोदा पोलिसांनी पाच आयोजकांसह तेरा नर्तिकांवर सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला.

पाच आयोजकांसह १३ नर्तिकांवर गुन्हा
पाटोदा : तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर यात्रेत नर्तिका नाचविल्या प्रकरणी पाटोदा पोलिसांनी पाच आयोजकांसह तेरा नर्तिकांवर सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला. तसेच नाचगाणे बंद करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या लोकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाली लिंबा भंडारे, प्राची हरिभाऊ वाघमोडे, सुरेखा बाजीराव पवार, किरण गुलाब शिंदे, विलास बाजीराव पवार, शितल दशरथ चव्हाण, दीपा काळे, राखी चंद्रकांत पवार, रिना रमेश पवार, शुभांगी पवार, सविता पवार, निलम बापू जाधव, संगिता दत्तु काळे, गिता विजय मुसळे, रवि शिवदास शिंदे, शाहु शिवराम शिंदे, नवनाथ रावसाहेब सानप, संजिवनी रामभाऊ सानप अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे, यात्रेत नर्तिका नाचविण्याच्या परवानगीसाठी पाच ते सहा आयोजक पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्याकडे महिनाभरापूर्वी आले होते. त्यावेळी अधीक्षकांनी त्यांना परवानी नाकारली होती. असा कार्यक्रम तुम्ही घ्याल तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही त्यांना दिली होती.
असे असतानाही सौताडा येथील रामेश्वर यात्रेत नर्तिका नाचविण्याचे प्रयोजन करण्यात आले. सदरील यात्रेत नर्तिका नाचविण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे़ मात्र दोन वर्षांपासून यात्रेत नर्तिका नाचविण्यावर बंदी घालण्यात आली़ गतवर्षीही नर्तिका नाचविल्या नव्हत्या़ मात्र यावर्षी यात्रेच्या महिनाभरापूर्वीच गावकऱ्यांनी नर्तिका नाचविण्यास परवानगी द्यावी, यासाठी गावकरी आग्रही होते़
प्रशासनाने फक्त बंदिस्त तंबूतील कार्यक्रमास परवानगी दिली होती मात्र येथे राजरोस उघड्यावर नर्तिका नाचवून नोटा उधळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवरी समोर आला. यात्रा असल्याकारणाने सोमवारी तेथे तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोर नर्तिका नचविल्या गेल्या. पोलीस कर्मचाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. याची गंभीर दखल घेतली गेली अन् नर्तिकांसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला़ (वार्ताहर)