सुविधांअभावी शाळेच्या आवारातच अंत्यसंस्कार
By Admin | Updated: September 30, 2016 01:15 IST2016-09-30T00:54:12+5:302016-09-30T01:15:02+5:30
अनिल तांगडे , वडोद तांगडा भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील योगेश भालेराव या जवानाचा बुधवारी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर जिल्हा परिषद शाळेच्या आवारातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुविधांअभावी शाळेच्या आवारातच अंत्यसंस्कार
अनिल तांगडे , वडोद तांगडा
भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील योगेश भालेराव या जवानाचा बुधवारी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर जिल्हा परिषद शाळेच्या आवारातच अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीसाठी हक्काची जागा नसणे आणि असुविधांमुळे ऐनवेळी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. यानिमित्ताने स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वडोद तांगडा या गावची लोकसंख्या आठ हजारांच्या जवळपास आहे. तसेच पंचायत समिती सर्कलचे गाव असून परिसरातील १२ शाळांचे केंद्र आहे. परंतु मागील काही दिवसांपासून गावात अपुऱ्या सुविधांचा त्रास ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. यातच स्मशानभूमीचा प्रश्न तर कित्येक वर्षांपासून रखडलेला आहे.
गावापासून अर्धा किमीच्या अंतरावर विविध समाजांसाठी स्मशानभूमी करण्यात आलेली आहे. याची कोठेही शासन दरबारी नोंद नाही. हक्काची स्मशानभूमीला जागा देण्यासाठी ग्रामस्थ आणि ग्राम पंचायतने वरिष्ठांकडे वारंवार मागणी केली, परंतु याची कसलीच दखल प्रशासनाकडून घेण्यात आली नाही.
तसेच हे गाव राजकीय क्षेत्रात नेहमीच चर्चेत असते. त्यातच पं. स. सर्कलचे गाव असल्याने येथे नेते, मंत्री, आमदार, खासदारांची नेहमीच ये-जा असते.
हे लोकप्रतिनिधी गावात आल्यानंतर ग्रामस्थ हक्काने त्यांच्याकडे स्मशानभूमिचा प्रश्न मांडतात. हे नेतेही नेहमीप्रमाणे आश्वासने देऊन ग्रामस्थांना शांत करतात, प्रत्यक्षात मात्र काहीच उपाययोजना करीत नसल्याने ग्रामस्थही आता संतप्त झाल्याचे पहावयास मिळत आहे. राजकीय नेत्यांची उदासिनता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच वडोद तांगडा येथील ग्रामस्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.