छत्रपती संभाजीनगर: मुलीच्या आजोबाकडे गडगंज संपत्ती आहे, त्यांची किंमती शेतजमीन आपल्याच गातात आहे, हे माहिती असलेल्या गणेश मोरे हाच या अपहरणाच्या कटाचा मुख्यसुत्रधार असल्याचे पोलिस तपासात समोर आले. अपहरण करून दीड कोटींची खंडणी मुलीच्या आजोबांकडे मागण्याची शक्कल त्यानेच लढतली.
गणेश हा अंबड तालुक्यातील एका गावात असलेल्या पतसंस्थेचा शाखा व्यवस्थापक आहे. इतर दोन आरोपी चालक असून, एकजण शेती करतो. अपहरण करण्यासाठी गणेशने १५ दिवसांपेक्षा अधिक काळ रेकी केली. त्यानंतर इतर सहभागी आरोपींना खंडणीतील प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी गणेशने गावातीलच सख्खा चुलता बाबासाहेब मोरे, बळीराम ऊर्फ भय्या महाजन यांच्यासह शेजारी गावातील संदीप ऊर्फ पप्पू पवार यांना तयार केले. त्यानुसार अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पण, शहरातील रस्त्यांची माहिती नसल्यामुळे आरोपींनी ज्या रस्त्यावर गाडी नेली, तो रस्ताच पुढे बंद होता. त्यामुळे त्यांना गाडी सोडून पळून जावे लागले.
फिर्यादीसह आरोपी एकाच गावचेअपहरणाचा प्रयत्न झालेल्या मुलीचे आजोबा, त्यांचा गाडीवरील चालक आणि तीन आरोपी एकाच गावातील आहेत. मुलीच्या आजोबांची संपूर्ण माहिती आरोपींना होती. मुलीचे आजोबा महागड्या गाडीतून गावात जात होते. त्याठिकाणी ये-जा असल्यामुळे आरोपींना त्यांच्याकडे संपत्ती असल्याची माहिती होती. तसेच त्याच गावातील चालक मुलीला क्लासला घेऊन जाणाऱ्या गाडीवर चालक हाेता. त्याचीही आराेपींसोबत ओळख होती. आरोपी त्याला फोनही करीत होता.
पुण्यातील प्लॅन फसलापुण्यातील खराडी परिसरातूनही एकाच्या अपहरणाचा प्लॅन करण्यात आला हाेता. मात्र, तो प्लॅन फसल्यामुळे आरोपींनी छत्रपती संभाजीनगर शहरातील मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचे आरोपीच्या चौकशीतून समोर आले आहे. त्यात मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडून याविषयी अधिक उलगडा होण्याची शक्यता आहे.
दोन आरोपींना पाच दिवसांची कोठडीशहर पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींना तपास अधिकारी पाेलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी न्यायालयात हजर केले. तेव्हा आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
कुटुंबाला दिले संरक्षणअपहरणाचा प्रयत्न झालेल्या मुलीच्या कुटुंबाला शहर पोलिसांनी संरक्षण दिले आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
चैतन्य तुपे प्रकरणाशी साधर्म्यशहरातील बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चैतन्य तुपे याच्या अपहरणानंतर आरोपींनी फोन करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या घटनेतील आरोपी जालना जिल्ह्यातीलच होते. त्यांनी बाहेरून येऊन अपहरण केले होते. बुधवारी घडलेल्या घटनेतही आरोपी जालना जिल्ह्यातीलच असून, त्यांनीही दीड कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा कट होता. तसेच यात मुलीचे आजोबा हे जमीन व्यावसायिक आहेत.
तांत्रिक माहितीचा बारकाईने अभ्यासमुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्यानंतर शहर पोलिसांच्या विविध पथकांनी संपूर्ण प्रकरणाचा, तांत्रिक माहितीचा बारकाईने अभ्यास करीत रातोरात आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेत घटनेचा उलगडा केला आहे.- प्रवीण पवार, पोलिस आयुक्त