धर्मांतर समजून घेण्यासाठी नव्याने इतिहास निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 00:40 IST2016-03-01T00:21:19+5:302016-03-01T00:40:53+5:30

लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ ला धर्मांतर का केले, हे समजून घ्यायचे असेल तर धर्मांतराचा नवा इतिहास विज्ञानवादी दृष्टीने लिहावा लागेल.

Create new history to understand conversions | धर्मांतर समजून घेण्यासाठी नव्याने इतिहास निर्माण करा

धर्मांतर समजून घेण्यासाठी नव्याने इतिहास निर्माण करा


लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ ला धर्मांतर का केले, हे समजून घ्यायचे असेल तर धर्मांतराचा नवा इतिहास विज्ञानवादी दृष्टीने लिहावा लागेल. इतिहासाच्या प्राध्यापकांनी हे आव्हान स्वीकारावे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी येथे सोमवारी व्यक्त केले.
श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालयात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध धम्म चळवळीची वाटचाल’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, चित्रकार भ.म. परसवाळे, मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे, डॉ. अनिल कटारे, डॉ. प्रशांत पुराणिक, प्रशासकीय अधिकारी डॉ. संजय देशमुख, प्रा.डॉ. राजकुमार कांबळे, डॉ. लक्ष्मी धोत्रे, भगवंत क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. कसबे म्हणाले, सध्याचा इतिहास राजा-राणींचा आहे. त्यांचे सौंदर्य, वर्णन व घटनांची जंत्री असलेला हा इतिहास आहे. हा इतिहास खराखुरा नाही. मानवाच्या सामाजिक व धार्मिक संघर्षाचा खराखुरा इतिहास लिहिला जात नाही. त्यामुळे इतिहास या ज्ञानशाखेचा मानवी जीवनाशी संबंध तुटला आहे. इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा वर्तमानात चाललेला संवाद असतो. घटनांची समीक्षा म्हणजे इतिहास. इतिहासकार हा प्रश्न विचारतो म्हणूनच तो वैज्ञानिक असतो, असेही डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले. जेएनयू विद्यापीठ व रोहित वेमुला प्रकरणाबाबत सडेतोड बोलताना डॉ. कसबे म्हणाले, मोघलांची हांजी हांजी करणारे व ब्रिटिशांचे बूट चाटणाऱ्या लोकांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ भारतातील बुद्धीवाद्यांचे विद्यापीठ आहे, त्याला कलंक लावू नका. हा देश आमचा आहे. आमच्या कष्टकरी, श्रमिकांनी हा देश निर्माण केला आहे. प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक प्रा.डॉ. राजकुमार कांबळे यांनी चर्चासत्राविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा.डॉ. पांडुरंग शितोळे यांनी केले. तर आभार प्रा.डॉ. लक्ष्मी धोत्रे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Create new history to understand conversions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.