फटाका मार्केट विखुरलेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:05 IST2017-10-04T01:05:21+5:302017-10-04T01:05:21+5:30
फटाका मार्केट यंदा कुठे भरवावे यासाठी व्यापा-यांकडून जागेची चाचपणी सुरू आहे.

फटाका मार्केट विखुरलेला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मागील वर्षी ऐन दिवाळीत औरंगपु-यातील फटाका मार्केटला आग लागल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. कोट्यवधी रुपयांचे या आगीत नुकसान झाले होते. सकाळी ११ वा. ही घटना घडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. औरंगपु-यात कोणत्याही परिस्थितीत फटाका मार्केट लागणार नाही, याची काळजी मनपाकडून घेण्यात येत आहे. फटाका मार्केट यंदा कुठे भरवावे यासाठी व्यापा-यांकडून जागेची चाचपणी सुरू आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात अनधिकृतपणे फटाक्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात येतात. या दुकानांपासूनही नागरिकांना मोठा धोका आहे.
दिवाळी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असून, शहरातील फटाका विक्रेत्यांची महापालिकेकडे परवानगीसाठी धडपड सुरू झाली आहे. गरवारे क्रीडा संकुल, कर्णपुरा देवीचे मैदान आदी भागात मार्केट भरविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
कर्णपुरा देवीचे मैदान छावणी परिषदेच्या अखत्यारीत आहे. गरवारे क्रीडा संकुलावर अलीकडेच कोट्यवधी रुपये खर्च करून क्रिकेटचे मैदान उभारण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या भागात मोठी जागाच नाही.
फटाका मार्केटसाठी जागा कोणती निवडावी हा सर्वात मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून फटाका मार्केट असोसिएशनचे पदाधिकारी, व्यापारी अग्निशमन कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. शहरात टी.व्ही.सेंटर, शिवाजीनगर, बीड बायपास आदी ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे काही दुकाने थाटण्यात येतात.
यातील काही दुकानांनाच परवानगी असते. मात्र, दुकानांमध्ये सुरक्षेचे कोणतेही उपाय नसतात. नागरी वसाहती जवळ असतानाही ही दुकाने अत्यंत बिनधास्तपणे थाटली जातात. महापालिकेने आजपर्यंत या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. अनधिकृत दुकानांमुळे महापालिकेला अजिबात महसूल प्राप्त होत नाही.