दुष्काळ जाहीर करण्यासाठी माकपचा मोर्चा
By Admin | Updated: August 24, 2014 23:53 IST2014-08-24T23:23:50+5:302014-08-24T23:53:01+5:30
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़

दुष्काळ जाहीर करण्यासाठी माकपचा मोर्चा
सेलू: परभणी जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे़ त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़
शेतकऱ्यांनी दुबार, तिबार पेरणी केली. परंतु, पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली व पिके सुकली. त्यामुळे कर्ज काढून केलेली पेरणी वाया गेली आहे़ अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, एकरी २५ हजारांची नुकसान भरपाई द्यावी, अर्ज दाखल केलेल्यांना पिवळे रेशन कार्ड द्यावे, निराधारांचे अर्ज मंजूर करावे, निवृत्ती वेतनाचे मानधन तीन हजार करावे, रोजगार हमीचे कामे देऊन मजुरांना रोजगार द्यावा, जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा, मे २०१४ ची मजुरांची थकीत रक्कम तात्काळ द्यावी आदी मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ मोर्चात रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे, उद्धव पौळ, लिंबाजी कचरे, दत्तुसिंग ठाकूर, आबासाहेब आवटे, दिगांबर पौळ, नारायण पवार, विष्णू चव्हाण, रामदास पौळ, मंगलाबाई डुकरे, रोहिदास हातडले यांच्यासह शेतमजूर सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)