ज्वारी कापणीसाठी गेलेल्या कुटुंबावर रानडुकराचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:04 IST2021-04-08T04:04:46+5:302021-04-08T04:04:46+5:30
सोयगाव : रब्बी ज्वारीची कापणी करण्यासाठी शेतात गेलेल्या एका मजूर कुटुंबावर रानडुकराने हल्ला केला. यात एक जण गंभीर जखमी ...

ज्वारी कापणीसाठी गेलेल्या कुटुंबावर रानडुकराचा हल्ला
सोयगाव : रब्बी ज्वारीची कापणी करण्यासाठी शेतात गेलेल्या एका मजूर कुटुंबावर रानडुकराने हल्ला केला. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना तालुक्यातील कवली शिवारात बुधवारी घडली. जखमी मजुराला उपचारासाठी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरे) येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
कवली शिवारात गट क्रमांक-एक मध्ये ज्वारी कापणीचे काम तडवी कुटुंबाने घेतले होते. बुधवारी सर्व तडवी कुटुंबीय ज्वारी कापणीसाठी शेतात गेले. तेव्हा अचानक ज्वारीत बाहेर आलेल्या रानडुकराने या कुटुंबावर हल्ला चढविला. यात अय्युब लालखा तडवी हे रानडुकराच्या तावडीत सापडले. रानडुकराने त्यांच्या मांडी, पोट, खांदा आदी ठिकाणचे लचके तोडले. इतर सदस्यांनी स्वत:ला सावरून प्रतिहल्ला चढविल्यानंतर रानडुकराने पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या अय्युब तडवी यांना कुटुंबीयांनी तत्काळ जळगाव जिल्ह्यातील (पिंपळगाव हरे, ता. पाचोरा) येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविले.
छायाचित्र : कवली येथे रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेले अय्युब तडवी.
070421\ynsakal75-0554515451_1.jpg
कवली येथे रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेले अय्युब तडवी.